

मुंबई: सर्वाधिक वर्दळ असलेल्या मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाकडून येत्या २० जुलैपासून आणखी १५ डब्यांच्या १० लोकल सुरू करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, नवीन रेल्वेऐवजी जुन्या १२ डब्यांच्या लोकलला तीन अधिक डब्बे जोडून त्यांचे रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाचा आहे.
मध्य रेल्वे स्थानकांवरील गर्दी पाहता लोकल डब्यात शिरताही येत नाही. त्यामुळे तिकीट घेऊनही उभे राहायला जागा नसते. सध्या मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या २२ आहे. लोकलमधील ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून १५ डब्यांच्या लोकलची संख्या ३२ होणार आहे.
या नवीन सुधारणेमध्ये मुंबईहून जाणाऱ्या अंबरनाथ ( सकाळी ९:१५ ), कल्याण (दु.१२:२७), बदलापूर ( दु. ०३:०३), कर्जत (सायं. ६:२१), अंबरनाथ ( रात्री ११:०८ ) या गाड्या १५ डब्यांच्या म्हणून धावणार आहेत. तसेच बाहेरून मुंबईत येणाऱ्या अंबरनाथ ( स. ७:५१ ), अंबरनाथ ( स. ११:०३ जलद ), कल्याण ( दु. १:३६ ), बदलापूर ( सायं. ४:४७), कर्जत ( रात्री ८:३८ ) गाड्यांचा समावेश आहे.
या घोषणेत कोणत्याही नवीन उपनगरीय सेवांचा समावेश नाही. तसेच दररोजच्या वेळापत्रकात मोठा बदल न करता केवळ अधिक प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपल्बध व्हावी म्हणून सध्याच्या १२ डब्यांच्या गाड्यांचे १५ डब्यांच्या लांब लोकलमध्ये श्रेणीसुधारणा करण्यात आली आहे.
दैनंदिन प्रवाशांना अधिक आराम मिळावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल.