

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकूण 227 जागांपैकी तब्बल 29 जागांवर आपले उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे या जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट महायुती अशा थेट लढती रंगल्या आहेत. काँग्रेस, वंचित आघाडीने उमेदवारच न दिल्याने या सर्व वॉर्डांत दुरंगी लढती होत असून मतविभाजनाची शक्यता मावळली आहे. त्यामुळे याचा लाभ ठाकरे बंधूंना मिळणार की महायुतीला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीपासून फारकत घेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या समविचारी पक्षाशी मोट बांधली. ठाकरे बंधूंची राजकीय आघाडी होत असताना महाविकास आघाडीचे समीकरण बिघडल्याचे यानिमित्ताने बोलले गेले. मात्र, काँग्रेस आघाडीने मुंबईतील जवळपास 29 जागांवर उमेदवार देण्याचे टाळल्याचे चित्र आहे. या 29 जागांवर मतविभाजन टळल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसमोर ठाकरे गटाच्या पक्षांशी थेट सामना होणार आहे. मुंबईतील काही वॉर्डांत अत्यंत चुरशीच्या लढती आहेत.
अशा ठिकाणी अवघ्या तीनशे - चारशे मतांचे विभाजन टळले तरी निकाल पूर्णपणे बदलू शकतात, असा दावा शिवसेना ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. विशेषतः पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वॉर्डांमध्ये दुरंगी लढती होत आहेत. या भागात महायुती आणि ठाकरे बंधू तुल्यबळ आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचा कस लागणार असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने समविचारी पक्षांसह सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी चालविली होती. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने 143 जागांवर, तर वंचित आघाडीने 46 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यातच 16 जागांवर वंचितने सक्षम उमेदवार नसल्याचे सांगत या जागा काँग्रेसला परत देऊ केल्या.
ज्या भागांत विजयाची शक्यता आहे, त्या ठिकाणीच लक्ष केंद्रित केल्याचे काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत जिथे पक्षाला समाधानकारक मते मिळाली नाहीत, तिथे उमेदवार देणे टाळल्याचा दावा मुंबई काँग्रेसमधील नेत्यांनी केला आहे.
काँग्रेसच्या या भूमिकेमागे मतविभाजन टाळणे, हासुद्धा एक विचार होता, असा दावाही या नेत्याने केला. दरम्यान, आमच्या पारंपरिक मतदारांचा आधार असलेल्या भागांवरच आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत असून याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असे मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले आहे.
काँग्रेस आघाडीने ज्या 29 जागांवर उमेदवार दिले नाहीत त्या भागांत 2017 साली 13 जागा भाजपला, तर 15 जागा एकसंध शिवसेनेला मिळाल्या होत्या, तर एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र, संबंधित नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेल्यामुळे, यावेळी काँग्रेसने त्या वॉर्डात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 च्या महापालिका वॉर्ड क्रमांक 13, 14, 15, 16, 21, 46, 80, 84, 106, 132, 172, 226 आणि 227 इथे भाजप उमेदवार यशस्वी ठरले होते, तर वॉर्ड क्रमांक 6, 11, 12, 18, 115 आणि 117 शिंदे गटाकडे आहेत, तर ठाकरे गटाकडे वॉर्ड क्रमांक 19, 25, 40, 128, 153, 182, 191, 198 आणि 203 या जागा आहेत. मात्र, आता या सर्वच जागांवर तुल्यबळ लढत होणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आणि महायुतीला सारी शक्ती पणाला लावावी लागणार आहे.