

मुंबई : बोगस प्रमाणपत्र रॅकेटच्या एका मुख्य आरोपीस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. प्रथमेश मणियार असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तो नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्या इच्छुकांना बोगस प्रमाणपत्र देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रथमेश मणियार आला होता. यावेळी त्याला संशयावरून इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. चौकशीत तो विदेशात नोकरीसाठी जात असल्याचे उघडकीस आले.
यावेळी त्याच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्यात काही बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रासह इतर आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. ती प्रमाणपत्रे भोपाळ, छत्तीसगढ, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील असल्याचे उघडकीस आले. तपासात तो विदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या इच्छुक उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र देत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तपासात तो काही वर्षांपासून बोगस प्रमाणपत्र बनविणाऱ्या टोळीत सक्रिय होता. त्याने आतापर्यंत अनेकांना पन्नास हजार ते दोन लाखांमध्ये बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी त्याने काही एजंटची नेमणूकही केली होती. याच एजंटच्या मदतीने त्याने अनेक बोगस पदवी प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिकांची विक्री केली होती. त्याने आतापर्यंत किती लोकांना बोगस प्रमाणपत्रे दिली आहेत, या गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.