

मुंबई : देशभरात सर्वाधिक गृहप्रकल्प महाराष्ट्रात सुरू असून, गेल्या वर्षभरात राज्यात 4 हजार 282 नव्या प्रकल्पांना महारेराकडून नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आले. यामुळे पुढील काही वर्षांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती केली जाणार आहे.
महारेराकडे येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या प्रस्तावांची तांत्रिक, आर्थिक आणि कायदेविषयक कठोर छाननी केली जाते. गरजेनुसार संबंधित विभाग सर्व अटींची व्यवस्थित पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी देतात. यानुसार 2025 या वर्षात 4 हजार 282 प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आले.
शहरानुसार विचार केल्यास 1 हजार 144 प्रकल्प हे केवळ पुण्यातील आहेत. यानंतर मुंबई शहरात 103 आणि उपनगरांत 587 असे मिळून 690 प्रकल्प आहेत. यानंतर 675 प्रकल्पांसह ठाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर रायगडमध्ये 384, नाशिकमध्ये 283, नागपूरमध्ये 281 , पालघरमध्ये 258 प्रकल्प आहेत. प्रादेशिक विभागांचा विचार केल्यास मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक 2 हजार 119 प्रकल्प आहेत. यानंतर पुणे प्रदेश 1 हजार 361, विदर्भ 346, खानदेश 319 आणि संभाजीनगरातील 91 प्रकल्पांसह 137 प्रकल्प येणार आहेत.
राज्यात बांधकामांना परवानगी देणारी एकूण 481 नियोजन प्राधिकरणे आहेत. या क्षेत्रातील नोंदणी क्रमांकासाठी येणाऱ्या प्रकल्पांची बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रे प्रमाणित करून घेण्यात अडचणी होत्या. केवळ मुंबई महापालिकेच्या परवानग्या संकेतस्थळावर असल्याने व त्याची महारेरा प्रणालीशी जोडणी केलेली असल्याने त्याची पडताळणी करणे शक्य होते.
इतरांची प्रारंभ प्रमाणपत्रे पूर्व घोषित समर्पित मेलवर आल्यानंतरच त्यांची पडताळणी शक्य होत होती. त्यात काही प्रमाणात विलंब होत होता. आता सर्व 481 नियोजन प्राधिकरणे महारेरा प्रणालीशी जोडण्यात येऊन त्यानुसार मंजूर आराखडे व बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होत आहेत. यामुळे ही माहिती संकेतस्थळावरून पडताळून घेण्याची सोय झाल्याने या कामाला गती मिळाली आहे.