

Mumbai Airport Flight Changes: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2026 पासून मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे ज्यांनी आधीच विमानाची तिकिटे बुक केली आहेत, त्यांनी प्रवासापूर्वी आपले फ्लाइट कोणत्या विमानतळावरून आणि कोणत्या टर्मिनलवरून सुटणार आहे, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
मुंबईतील वाढत्या विमान वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि विमानतळाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येणार आहेत.
1 ऑक्टोबर 2026 पासून मुंबई विमानतळावरील सुमारे एक तृतीयांश विमान वाहतूक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवली जाणार आहे.
याचा अर्थ मुंबई विमानतळावरून जाणाऱ्या काही फ्लाइट्स आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आणि फ्लाइटची माहिती काळजीपूर्वक तपासावी.
यानंतर 25 ऑक्टोबर 2026 पासून आणखी एक मोठा बदल होणार आहे. सध्या मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 वरून जाणाऱ्या सुमारे एक तृतीयांश फ्लाइट्स टर्मिनल 2 वर हलवल्या जाणार आहेत.
त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटावर आधी टर्मिनल 1 असले तरी प्रवासाच्या तारखेपर्यंत फ्लाइट टर्मिनल 2 वर हलवली जाऊ शकते. अशा वेळी चुकीच्या टर्मिनलवर पोहोचल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते आणि फ्लाइटही चुकण्याची शक्यता आहे.
मुंबई विमानतळाच्या पुनर्विकासाचा भाग म्हणून 15 जानेवारी 2027 पासून टर्मिनल 1Bच्या उत्तरेकडील भागाचे पाडकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.
टर्मिनल 1 हे जवळपास 80 वर्षे जुने आहे. या टर्मिनलचा काही भाग यापूर्वीच पुनर्विकासासाठी पाडण्यात आला आहे. आता उर्वरित भागातही टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे.
मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 मिळून दररोज सुमारे 950 विमानांची ये-जा होते. त्यामुळे हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. दोन्ही टर्मिनलची प्रवासी हाताळण्याची क्षमता वेगवेगळी आहे.
टर्मिनल 1 मधून वर्षाला सुमारे 1.5 कोटी प्रवासी ये-जा करतात. तर टर्मिनल 2 ची वार्षिक क्षमता सुमारे 4 कोटी प्रवासी इतकी आहे. विमान वाहतुकीचे नियोजन, प्रवाशांची संख्या आणि टर्मिनलच्या पुनर्विकासाचे काम लक्षात घेऊन फ्लाइट्समध्ये हे बदल केले जात आहेत.
जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2026 नंतर मुंबईहून किंवा मुंबईकडे विमान प्रवासासाठी तिकीट बुक केले असेल, तर प्रवासापूर्वी तुमची फ्लाइट नेमकी कुठून सुटणार आहे, हे नक्की तपासा.
तुमची फ्लाइट मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1, टर्मिनल 2 किंवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणार आहे का, याची माहिती संबंधित एअरलाइनकडून घ्या.