Samay Raina: ‘माझं आणि महाराष्ट्र सायबरचं नातं...’, मुख्यमंत्र्यांसमोर समय रैनाचा भन्नाट डायलॉग; सभागृहात हशा, Video Viral

Samay Raina Maharashtra Cyber 1930: मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या जनजागृती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉमेडियन समय रैनासह अनेक कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
Samay Raina CM Devendra Fadnavis
Samay Raina CM Devendra FadnavisPudhari
Published on
Updated on

Samay Raina Maharashtra Cyber 1930: सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘डिजिटल अरेस्ट’ या जनजागृतीपर लघुपटाचे आणि ‘1930 महाराष्ट्र सायबर अँथम’चे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चित्रपट, संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

या उपक्रमात योगदान दिल्याबद्दल अभिनेता आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, मंगेश देसाई, गायिका सुनिधी चौहान आणि कॉमेडियन समय रैना यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘माझं आणि महाराष्ट्र सायबर सेलचं नातं खूप जुनं’

सत्कार स्वीकारल्यानंतर समय रैनाने आपल्या खास विनोदी शैलीत भाषण केले. महाराष्ट्र सायबर सेलशी आपलं जुनं नातं असल्याचे सांगत त्याने उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

समय रैना म्हणाला, “सत्काराबद्दल खूप धन्यवाद. माझं आणि महाराष्ट्र सायबर सेलचं नातं खूप जुनं आहे. महाराष्ट्र सायबर सेल खूप अॅक्टिव्ह आहे. तुम्ही कुठेही असाल, भारतात किंवा अमेरिकेत, ते तुम्हाला पकडतात.”

Samay Raina CM Devendra Fadnavis
Family Court: कमाई कमी दाखवून पोटगी टाळता येणार नाही; पत्नी-मुलांना दरमहा 2 लाख देण्याचे कोर्टाचे आदेश, काय आहे प्रकरण?

यानंतर त्याने 1930 या सायबर हेल्पलाइन क्रमांकाबद्दलही विनोद केला. “1930 हा खरोखरच खूप चांगला नंबर आहे. मी तो सेव्ह करून ठेवला आहे, कारण मला तिथून अनेकदा फोन येतात,” असे म्हणत त्याने पुन्हा एकदा उपस्थितांना हसवले.

कार्यक्रम सकाळी असल्याने समयने त्यावरही गंमतीशीर टिप्पणी केली. “पहिल्यांदाच सायबर सेलने एखाद्या कॉमेडियनला सकाळी उठवून त्याचा सत्कार केला आहे,” असे तो म्हणाला.

सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी जनजागृती महत्त्वाची

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांविरोधात लढण्यासाठी जनजागृती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. कलाकार, अभिनेते आणि गायक यांच्या माध्यमातून सायबर फसवणुकीबाबतचा मेसेज नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांनी म्हटले.

सायबर गुन्हेगार अनेकदा पोलिस, सीबीआय अधिकारी किंवा न्यायाधीश असल्याचे भासवून लोकांना घाबरवतात. भीती दाखवून नागरिकांकडून पैसे उकळले जातात. अशा कोणत्याही धमकीला किंवा दबावाला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Samay Raina CM Devendra Fadnavis
Apple iPhone 18 Launch Event 2026: Appleचा मोठा धमाका! iPhone 18 येणार? भारतात कधी आणि कुठे पाहता येणार LIVE इव्हेंट?

‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे नेमकं काय?

सध्या देशभरात 'डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. या प्रकारात फसवणूक करणारे लोक स्वतःला पोलिस, सीबीआय, ईडी किंवा इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगतात.

त्यानंतर ते नागरिकांना व्हिडिओ कॉल करतात आणि त्यांच्या नावावर गुन्हा झाल्याचा दावा करतात. काही वेळा तुमच्या आधार कार्डाचा, बँक खात्याचा किंवा मोबाइल नंबरचा गुन्ह्यात वापर झाल्याचे सांगून भीती दाखवली जाते.

यानंतर नागरिकाला फोन किंवा व्हिडिओ कॉलवरच राहण्यास भाग पाडले जाते. त्याला कोणाशीही बोलू नका, घराबाहेर जाऊ नका किंवा आमच्या परवानगीशिवाय काही करू नका, अशा धमक्या दिल्या जातात. अशा फसवणुकीला ‘डिजिटल अरेस्ट’ म्हणतात.

मात्र, कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही प्रक्रिया नाही. कोणताही पोलिस किंवा सरकारी अधिकारी व्हिडिओ कॉलवर एखाद्या व्यक्तीला अटक करून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी घाबरू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news