

Baramati plane crash : बारामती विमानतळावर आज (दि. ९ ऑगस्ट) पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. लँडिंग करत असताना एका खासगी विमान प्रशिक्षण संस्थेचे विमान धावपट्टीवरून खाली घसरून अपघातग्रस्त झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वैमानिक बालंबाल बचावले आहेत.
आज दुपारी बारामती विमानतळावर 'कार्व्हर एव्हिएशन' (Carver Aviation) या खासगी कंपनीचे 'सेस्ना १७२' (Cessna 172) हे प्रशिक्षण विमान लँड करत असताना धावपट्टीवरून खाली घसरले.प्रत्यक्षदर्शींच्या प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंगच्या वेळी अत्यंत कमी उंचीवर उडत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. लँडिंग दरम्यान विमानाचा एक भाग शेजारील लाईटच्या खांबाला धडकला आणि विमान धावपट्टीच्या हद्दीबाहेर जाऊन कोसळले.
या घटनेच्या वेळी विमानात प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी असे दोन जण सवार होते. अपघातात विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी दोन्ही वैमानिकांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि विमानतळ प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. "कार्व्हर एव्हिएशनच्या सेस्ना १७२ विमानाचे लँडिंग करत असताना अपघात झाला असून ते धावपट्टीवरून घसरले. विमानात दोन व्यक्ती होत्या आणि त्या दोघेही सुरक्षित आहेत. विमानामध्ये नेमका तांत्रिक बिघाड झाला होता की अन्य काही कारणांमुळे हा अपघात घडला, याचा सखोल तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करत आहेत." अशी माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.
बारामती विमानतळावरील या अपघातामुळे सात महिन्यांपूर्वी घडलेल्या भीषण दुर्घटनेच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी याच बारामती विमानतळावर महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला होता. 'व्हीएसआर व्हेंचर्स' कंपनीच्या 'लियरजेट ४५' या चार्टर्ड विमानाचे दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न सुरू असताना झालेल्या या अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेत अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक, अटेंडंट आणि दोन वैमानिक (कॅप्टन सुमित कपूर व सह-वैमानिक शांभवी पाठक) यांना प्राण गमवावे लागले होते.
बारामती परिसरात 'कार्व्हर एव्हिएशन' आणि 'रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी' या दोन प्रमुख वैमानिक प्रशिक्षण संस्था कार्यरत असून तिथे शेकडो विद्यार्थी विमान चालवण्याचे धडे घेतात. मात्र, या प्रशिक्षण केंद्रांच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात आता गंभीर चिंतेचा विषय बनले आहेत. यापूर्वी १३ मे रोजी 'रेडबर्ड' अकॅडमीच्या एका प्रशिक्षण विमानाचा बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावाजवळ सकाळी ८:५० वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. त्यावेळी सुदैवाने प्रशिक्षणार्थी वैमानिक सुरक्षित बचावला होता. रेडबर्डच्या विमानांचे यापूर्वीही २ ते ३ वेळा अपघात घडले आहेत. आता कार्व्हर एव्हिएशनच्या विमानाचा अपघात झाल्याने बारामतीमधील प्रशिक्षण विमानांची देखभाल, तांत्रिक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.