

Mumbai Airport Capacity Upgrade: देशातील सर्वात वर्दळीचे विमानतळ असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. विशेष बाब म्हणजे हा बदल कोणतीही नवी धावपट्टी किंवा भव्य टर्मिनल उभारून होणार नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार आहे.
मुंबई विमानतळावर दररोज शेकडो विमाने उतरतात आणि उड्डाण करतात. वाढती प्रवासी संख्या, मर्यादित जागा आणि एकाच धावपट्टीवरची प्रचंड वाहतूक ही मुंबई विमानतळाची अडचण राहिली आहे. मात्र आता एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) व्यवस्थेत बदल करून या अडचणीवर तोडगा काढण्याची तयारी सुरू झाली आहे.
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आता विमानतळावर अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आणणार आहे. या प्रणालीमुळे विमान कधी उतरायचं, किती अंतर ठेवायचं, कोणतं विमान आधी येणार, हे सगळं संगणक अचूकपणे ठरवेल. सध्या हे काम मोठ्या प्रमाणात एअर ट्रॅफिक कंट्रोलर करत आहे. नव्या प्रणालीमुळे काम अधिक सोपं, सुरक्षित आणि वेगवान होईल. ही सिस्टिम 2028 च्या अखेरपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली सुरू झाली, तर मुंबई विमानतळाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
या नव्या व्यवस्थेमुळे
एका तासात अधिक विमाने सुरक्षितपणे उतरू शकतील
विमानांना हवेत जास्त वेळ फिरत राहावं लागणार नाही
प्रवासासाठी उशीर होणार नाही
विमान कंपन्यांचा इंधन खर्च कमी होईल
प्रदूषणही थोडं कमी होईल
म्हणजेच प्रवासी, विमान कंपन्या आणि पर्यावरण या सगळ्यांनाच फायदा होणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही नवी प्रणाली फक्त सध्याच्या मुंबई विमानतळापुरती मर्यादित नसेल. पुढे सुरू होणाऱ्या नवी मुंबई विमानतळासाठीही हीच प्रणाली वापरली जाणार आहे. यामुळे मुंबई परिसरातील दोन्ही विमानतळांवरील विमानांची ये-जा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने हाताळता येणार आहे.
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं (AAI) लक्ष्य आहे की हे नवं तंत्रज्ञान 2028 पर्यंत पूर्णपणे सुरु कराव. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून यंत्रणा, प्रशिक्षण आणि देखभाल यासाठी तयारी सुरू आहे. जागा कमी, प्रवासी जास्त ही मुंबईची कायमची अडचण आहे. पण आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे नवी धावपट्टी न बांधताही मुंबई विमानतळ अधिक कार्यक्षम होणार आहे.