

Gold Loan Rules India Explained: सोन्याच्या किमती सध्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या असल्या, तरीही गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांना आता अपेक्षेपेक्षा कमी पैसे मिळत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेला इशारा आणि त्यानंतर बँका तसेच एनबीएफसींनी (NBFCs) गोल्ड लोनचे नियम अधिक कडक केले आहेत.
आतापर्यंत बँका आणि वित्तीय संस्था सोन्याच्या एकूण किमतीच्या सुमारे 70 ते 72 टक्क्यांपर्यंत कर्ज देत होत्या. मात्र आता हा Loan-to-Value (LTV) रेशो कमी करून 60 ते 65 टक्क्यांपर्यंत आणण्यात आला आहे. याचा थेट परिणाम असा झाला की, तेवढ्याच वजनाचं सोनं गहाण ठेवलं तरी ग्राहकांना आधीपेक्षा कमी पैसे मिळत आहेत.
RBIची सर्वात मोठी चिंता म्हणजे जागतिक अनिश्चितता आणि चलन बाजारातील चढ-उतार ही आहे. सध्या सोन्याचे दर उच्चांकावर असल्यामुळे अनेक कर्जदार जास्तीत जास्त कर्ज घेत आहेत. मात्र भविष्यात जर सोन्याच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी घसरल्या, तर गहाण ठेवलेल्या दागिन्यांची किंमत कर्जाच्या थकबाकीपेक्षा कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत कर्जफेड न होण्याचा धोका वाढतो, अशी RBIची भीती आहे.
यापूर्वी मायक्रोफायनान्स आणि पर्सनल लोन क्षेत्रात आलेल्या संकटांचा अनुभव लक्षात घेता, बँका आणि एनबीएफसी आता कर्जवाढीऐवजी स्थिरता आणि सुरक्षिततेवर भर देत आहेत. कर्जदारांवरील परतफेडीचा ताण कमी करण्यासाठी आणि बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता टिकवण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ नये, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सध्या MCX स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव सुमारे 1 लाख 31 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किमतीत जवळपास 35 टक्क्यांची वाढ झाली आहे.
याच वाढीमुळे गोल्ड लोनची मागणीही प्रचंड वाढली असून, मार्च 2025 नंतर दागिन्यांच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या कर्जात वर्षभरात सुमारे 100 टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूणच, सोने महाग झालं असलं तरी जोखीम टाळण्यासाठी बँकांनी नियम कडक केल्यामुळे गोल्ड लोनवर मिळणारी रक्कम कमी झाली आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.