

भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खा. सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर महाविकास आघाडीच्या खासदारांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
या निदर्शन आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे खासदार सहभागी झाले होते. दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा देत मागणीचे फलक घेऊन खासदारांनी हे आंदोलन केले.
मागील 11 वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने करण्यात येत आहे. जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणार नाही, तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे. दरम्यान येत्या 20 तारखेपर्यंत नामकरणाचा निर्णय न घेतल्यास 22 डिसेंबर रोजी भिवंडी मानकोली ते नवी मुंबई विमानतळ येथपर्यंत लाँग मार्च काढून आंदोलन करण्यात येणार आहे.