

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मंगळवारी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेने धक्का दिला. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने संतोष धुरी नाराज असल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यातच संतोष धुरी यांनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संतोष धुरी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात होते. अखेर मंगळवारी त्यांनी भाजपात प्रवेश केला.
दुसरीकडे, मनसेचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. मनसेचे सरचिटणीस राजा चौगुले, प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ॲड. देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर आणि संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनीही मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दशरथ पाटील महापौर असताना पार पडलेल्या नाशिक कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख करत, कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य आयोजनाचे नियोजन, प्रशासनाशी समन्वय आणि जनतेच्या सोयीसुविधांचा अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी अख्खा पक्षच उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना सरेंडर केला आहे. संतोष धुरी म्हणाले की, मनसेला 52 जागा सोडण्यात आल्या आहेत. पण त्यातील 7 किंवा 8 जागा तरी जिंकता येतील का, हा प्रश्न आहे. माहीम, दादर, वरळी,भांडुप जिथे आमची ताकद जास्त तिकडे दोन जागा मागितल्या, पण एका जागेवर बोळवण केली. वॉर्ड 194 दिला नाही म्हणून मी नाराज,असा विषयच नव्हता.
ते पुढे म्हणाले की, आमचे नेते संदीप देशपांडे यांना युतीच्या कोणत्याही चर्चेत सहभागी करून घेण्यात आले नाही. हे दोन चेहरे कुठल्याही चर्चेत दिसलेच नाही पाहिजेत, असे मातोश्री बंगल्यावरूनच सांगण्यात आले होते. धुरी, देशपांडे हे दोन किल्ले वांद्य्राच्या तहात सरेंडर करण्यात आले. हे मी देशपांडे यांना सांगितले आहे, देशपांडे बाहेर पडू शकत नाही, पण मी यातून बाहेर पडलो, असे संतोष धुरी यांनी यावेळी नमूद केले.