

मुंबई : केंद्र शासनाच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीर जवानांना आता महाराष्ट्रात शासकीय-निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये संधी मिळणार आहे. त्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने पुणे येथील सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना केली आहे. या अभ्यासगटाला सर्वतोपरी अभ्यास करून शिफारशींसह तीन महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
अग्निवीर योजनेमुळे तरुणांना चार वर्षे भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी मिळत असली तरी त्यांच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढील रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातून या भरती योजनेंतर्गत पहिल्या तुकडीत 2839 अग्निवीरांनी सहभाग घेतला होता.
या अग्निवीरांना यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर, 2026 मध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत. सदर योजनेनुसार अग्निवीरांमधील 25 टक्के अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होईल. मात्र उर्वरित 75 टक्के अग्निवीरांचा पोलीस, वनविभाग,अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दल यांसारख्या शासकीय सेवांमध्ये समावेश करून घेतल्यास त्यांच्या कौशल्य व प्रशिक्षणाचा शासनास उपयोग होऊन, उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण झालेले अधिकारी-कर्मचारी शासनास प्राप्त होतील. या बाबी विचारात घेऊन, अग्निवीर जवानांना शासकीय-निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासगटाची स्थापन करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
पुणे येथील सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यासगटात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे (निवृत्त), छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सईदा फिरासत (निवृत्त), ले. जनरल आर.आर. निंभोरकर (निवृत्त), एअर मार्शल नितीन शंकर वैद्य (निवृत्त), रिअर ॲडमिरल आशिष कुलकर्णी (निवृत्त) यांचा सदस्य म्हणून, तर पुण्याचे सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक ले.कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.