

मुंबई : नरेश कदम
वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील राज्यसभेचे सात खासदार 2 एप्रिलला निवृत्त होत असून राज्य विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहिले तर महाविकास आघाडी एकत्र लढली तर राज्यसभेची एक जागा निवडून येईल. पण आघाडीने दुसरा उमेदवार उभा केला तर तो निवडून येणे कठीण आहे. दुसरीकडे महायुतीचे सहा उमेदवार निवडून येतील.
शरद पवार यांच्यासह फौजिया खान( शरद पवार गट) , रजनी पाटील( काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी ( उद्धव ठाकरे गट) , भागवत कराड(भाजप), धैयशील पाटील(भाजप) आणि रामदास आठवले ( आठवले गट) असे सात खासदार निवृत्त होत आहेत. यात महाविकास आघाडीचे चार आणि भाजप युतीचे तीन खासदार आहेत. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 131, एकनाथ शिंदे गट 57 आणि अजित पवार गट 40 असे 228 आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या बरोबरीने सहा जागा निवडून येतील. महायुतीतील पक्षनिहाय संख्याबळ बघितले तर भाजपचे चार आणि एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे प्रत्येकी एक खासदार निवडून येईल.
एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 37 मतांचा कोटा आहे. पण क्रॉस मतदानाचा धोका बघता किमान 40 मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला ठेवतो. त्यामुळे अजित पवार गटाचा एक उमेदवार निवडून येईल एवढी मते त्यांच्याकडे आहे.
शिंदे गटाकडे 57 मते असून त्यांच्याकडे 17 मते अतिरिक्त आहेत. पण त्यांना ही मते भाजपच्या चौथ्या उमेदवाराला द्यावी लागतील. जर शिंदे यांनी दुसरी जागा मागितली तर तर भाजपला आपली अतिरिक्त मते त्यांना द्यावी लागतील आणि भाजपला तीन उमेदवारच उभे करावे लागतील.
आघाडीने एकच उमेदवार दिला तर काँग्रेस 16, ठाकरे गट 20 आणि शरद पवार गट 10 अशा 46 मतांवर त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकेल.
शरद पवार पुन्हा निवडणूक लढविणार आहेत का हे अजून निश्चित नाही. त्यामुळे आघाडीतील तीन पक्षांमध्ये ही एकमेव जागा कोण लढविणार हे अजून ठरायचे आहे. भाजप आपल्या निवृत्त होणाऱ्या विद्यमान तीन खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार की नाही हे अजून ठरायचे आहे.