

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे अपेक्षित होते. मात्र पक्षातील वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेना भाजपाची महायुती झाली.
या युतीमुळे अनेक इच्छुकांना पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. यामध्ये काही ठिकाणी फक्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तर काही ठिकाणी शिवसेना भाजपाच्या इच्छुकांनी एकत्र येत आपले स्वतंत्र पॅनल उभे केल्याने शिवसेना भाजपा समोर आव्हान उभे ठाकले आहे.
कल्याण मधील पॅनल क्रमांक 6 मधून महायुतीच्या जागावाटपात संपूर्ण पॅनल मधील चारही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आल्याने मूळ भाजप कार्यकर्त्यां मध्ये तीव्र नाराजी पसरली असून थेट त्यांनी बंडखोरीचे हत्यार उगारले आहे. भाजपमध्ये अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही पक्षाने दखल घेतली नाही, असा आरोप करत भाजप मंडळ उपाध्यक्ष सुधीर वायले यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पॅनल क्र. 6 मधून चारही भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सुधीर वायले, सचिन यादवाडे, तृप्ती भोईर आणि नीता देसले यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पॅनल क्रमांक 2 मध्ये देखील उमेदवारी न मिळाल्याने भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. यामध्ये भाजपाचे मोहने मंडल अध्यक्ष नवनाथ पाटील, त्यांच्या पती सारिका पाटील, सुवर्णा मोहन कोनकर आणि माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्वतंत्र पॅनल उभं करत पक्षाला आव्हान दिले आहे.
त्याचप्रमाणे टिटवाळा येथे प्रभाग क्र. 3 मध्ये शिवसेना भाजपाच्या नाराज इच्छुकांनी एकत्र येऊन स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. यामध्ये दिपक कांबळे, अंजना बुधाराम सरनोबत, निता विजय देशेकर आणि मोरेश्वर तरे यांचा समावेश आहे. तर पॅनल क्र.5 मध्ये देखील महायुतीला फटका बसला असून येथील सर्व जागा शिवसेनेला दिल्याने नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. यामध्ये भाजपा कार्यकर्ता सदा कोकणे, विकास कोकतरे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांची सून कोमल मयूर भोईर आणि साधना रवी गायकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अशाचप्रकारे इतर अनेक प्रभागांमध्ये अनेक नाराज उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 2 आणि 3 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा मधील पक्ष श्रेष्ठी या नाराज उमेदवारांची नाराजी दूर करण्यात यश येते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.