

मुंबई : संजय कदम
वर्षभरातील चांगल्या आठवणी मनात साठवून, मुंबईकरांनी 2025 ला अलविदा केला. तर पुढील वर्षी आयुष्यात नवीन चांगले काही घडेल वनवीन वर्षसुख-समृद्धीचे जाईल, असे अपेक्षित ठेऊन 2026 चे जल्लोषात स्वागत केले. यावेळी बुधवार रात्रीपासून गुरुवार पहाटेपर्यंत गेटवे ऑफ इंडियासह मुंबईतील समुद्र किनारे मुंबईकरांनी गजबजून गेले होते. मुंबई, ठाण्यासह अख्या महामुंबईत जल्लोषाचे वातावरण होते.
सरत्यावर्षाला निरोप वनवीन वर्षाचे स्वागतासाठी मुंबई गेल्या दोन दिवसापासून सज्ज झाली होती. लहान मोठी हॉटेलसह क्लब मध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांना बाहेर जाणे शक्य नाही. अशांनी गृहसंकुलामध्येच पार्टीचे आयोजन करून जल्लोष केला. गेटवे ऑफ इंडियासह मरीन ड्राईव्ह जुह, गिरगाव, सात बंगला, मढ, गोराई आदी चौपट्यांसह हॉटेल, क्लब, गृह संकुल मुंबईकरांनी गजबजून गेले होते. मध्यरात्री ठीक बारा वाजण्याच्या ठोक्याला चौपाटीवरील फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजीही मुंबईकरांचे लक्ष वेधून गेली.
बुधवार सायंकाळी 7 वाजल्यापासून चौपाटी परिसर नागरिकांनी अक्षरश: फुलून गेला होता. रात्री बारा वाजता कुटुंबसह मित्र मंडळी सोबत आलेल्या नागरिकांनी एकमेकाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यात महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. क्लब, हॉटेलमध्येही लाईव्ह गाण्यांसह डिजेचे आयोजन करण्यात आले होते.
नववर्ष स्वागतासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य व पश्चिम रेल्वेसह बेस्टनेही रात्रभर चर्चगेट ते विरार सीएसएमटी ते कल्याण अतिरिक्त गाड्या चालवल्या. त्यामुळे रात्री उशिराही नागरिकांना आपल्या घरी जाणे शक्य झाले.
मुंबई दर्शनासाठी बेस्टने बुधवार दुपारपासून गुरुवार पहाटेपर्यंत मुंबई दर्शनासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) - गेट वे ऑफ इडिया मंत्रालय एनसीपीए नरिमन पॉईंट विल्सन कॉलेज नटराज हॉटेल चर्चगेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुतात्मा चौक रिझर्व बँक ओल्ड कस्टम हाऊस म्युझियम या मार्गावर प्रत्येकी 45 मिनिटांच्या अंतरात डबलडेकर एसी बस चालवल्या. या टूरची मज्जाही शेकडो मुंबईकरानी लुटली.