

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी नामनिर्देशन अर्ज भरल्यानंतर बुधवारी इच्छुकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून भाजपा व शिवसेना एकमेकांना भिडली. प्रतिज्ञापत्रांमध्ये माहिती लपवण्यात आल्याचे आरोप एकमेकांवर केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
दिघा येथील निवडणूक कार्यालयात भाजपचे नवीन गवते यांनी शिवसेना शिंदे गटाचे विजय चौगुले यांनी प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप करत हरकत नोंदवली. याला प्रत्युत्तर देताना चौगुले यांनीही गवते यांच्यावर गुन्ह्यांची माहिती कमी दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
त्याचप्रमाणे भाजपचे अनंत सुतार यांच्या प्रतिज्ञापत्रावर शिंदे गटाचे आकाश मढवी व राजू पाटील यांनी हरकत घेतली. या परस्पर आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुनावणी दरम्यानच भाजप व शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.