

मुंबई : चीन, व्हिएतनाम येथील स्टील आयातीवर भारताने सेफगार्ड शुल्क लावल्याने मेटल कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली. वर्षाच्या अंतिम सत्रात शेअर निर्देशांकाने उसळी घेतली. सेन्सेक्स 545 आणि निफ्टी 190 अंकांनी वधारला.
बीएसईतील गुंतवणूकदारांनी चार लाख कोटींची कमाई केली. कंपन्यांचे भांडवली मूल्य 472 वरून 476 लाख कोटी रुपयांवर गेले. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स निर्देशांक 0.64 टक्क्याने वधारून 85,220 अंकांवर विसावला. रिलायन्स, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर भावात मोठी वाढ झाली. बीएसई मिड कॅप निर्देशांक एक आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1.19 वधारल्याने सेन्सेक्सला उभारी मिळाली.
निफ्टी-50 निर्देशांकातील 44 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ नोंदवण्यात आली. जेएसडब्ल्यू स्टील 4.88, ओएनजीसी 2.46 आणि टाटा स्टीलच्या शेअर 2.35 टक्क्यांनी उसळी घेतली, टीसीएस 1.13, टेक महिंद्रा 0.85 आणि ग्रासिम इंडस्ट्रीच्या शेअर भावात 0.31 टक्क्याने घट झाली.
ऑईल अँड गॅस निर्देशांकाने 2.66, कन्झ्युमर ड्युरेबल्स, मीडिया, मेटल, पीएसयू बँक, ऑटो आणि प्रायव्हेट बँक निर्देशांकात एक टक्क्याहून अधिक वाढ झाली.