

मुंबई : मुंबई महापालिकेचा प्रभाग क्रमांक 03 मध्ये जनतेसाठी काम करण्याची धमक असणारा उमेदवार प्रकाश दरेकर भाजप-शिवसेना-रिपाइं युतीने तुम्हाला दिला आहे, असे प्रतिपादन भाजपचे गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी येथे केले.
मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपा-शिवसेना महायुतीचे प्रभाग क्रमांक 03 चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दहिसर केतकीपाडा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. प्रकाश दरेकर यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी प्रभाग क्रमांक 3 चे भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर, आरपीआयचे जिल्हाअध्यक्ष रमेश गायकवाड, मोतीभाई देसाई, ललित शुक्ला, वॉर्ड अध्यक्ष निकेश तळेकर, मागाठाणे विधानसभा संयोजक कृष्णकांत दरेकर, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, निशांत कोरा, शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख देविदास चव्हाण, जयदीप गुरव, सुमित यादव, संजय झा, सुभाष कदम, नीता कराळे, मनोज गुप्ता, नामदेव सूर्यवंशी, हसीना शेख, यशपाल यादव, दीपक पाटील यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी दहिसर केतकीपाडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वॉर्ड क्रमांक 03 चे शाखाध्यक्ष रमेश
अंबोरेेे यांनी त्यांच्या शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. तुमचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी अंबोरेे यांना आश्वस्त केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, शांतीनगर, केतकीपाडा येथील अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे जसेच्या तसे आहेत. वन जमिनीच्या प्रश्नावर अनेक जण नगरसेवक झाले. आता येत्या पाच वर्षांत वन जमिनीवरील मूलभूत सुविधा, घरे करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न असेल. केंद्रात आपले खासदार पियूष गोयल मंत्री आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत. महायुतीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवरही आपली सत्ता असली पाहिजे.
दरेकर पुढे म्हणाले की, प्रभाग क्रमांक 03 हा कष्टकरी लोकांचा आहे. मुंबई बँकेमार्फत मुंबईतील महिलांना उद्योग व्यवसायासाठी एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही देत आहोत. लाडकी बहीण म्हणून मिळणारे दीड हजार छोटया मोठया व्यवसायात गुंतवले तर महिलांच्या कुटुंबाला हातभार लागेल. आतापर्यंत आम्ही 400-500 महिलांना व्यवसायासाठी एक लाखापर्यंतचे कर्ज दिले. आगामी काळात केतकीपाड्यातील सर्व कष्टकरी महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजनेच्या माध्यमातून ग्रुप-ग्रुपमधून छोटे घरगुती व्यवसाय करता येतात का याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दरेकरांनी दिली. मी स्वतः माझ्या निधीतून डोंगरावर राहणाऱ्या लोकांना पाणी दिले. त्यातही काही जण राजकारण करत आहेत, असे टीकास्त्र सोडत दरेकर म्हणाले, वॉटर, मीटर आणि गटार या पलीकडे जाऊन आपल्याला विकास करायचा आहे.
गुंडगिरी चालणार नाही. कुठलाही राजकीय पक्ष गुंडांचा वापर करत असेल तर त्यांचाही बंदोबस्त केला जाईल. भविष्यात केतकीपाडा, शांतीनगरमध्ये गुन्हेगार तयार होणार नाहीत याची काळजी घेऊ. जे गुन्हेगार असतील त्यांचाही बंदोबस्त करू, असा इशाराही प्रवीण दरेकरांनी यावेळी दिला.