

मुंबई : धारावी ही फक्त झोपडपट्टी नाही. बहुरंगी, बहुढंगी अशा धारावीत कलाकुसर आहे, विविध दर्जेदार उत्पादनांची इथे निर्मिती होते. या धारावीचा पुनर्विकास करताना प्रत्येक धारावीकराला इथे घर मिळणार आहे. पात्र लोकांसोबत अपात्र लोकांनाही घरे देणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.
पालिका निवडणुकीनंतर वाजतगाजत या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी धारावीतील प्रचारसभेत केली.
धारावीतील जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा अपप्रचार केला जात आहे. कुणी खासगी व्यक्ती नव्हे तर राज्य सरकार, एसआरए यांची भागीदारी असलेली डीआरपीएल कंपनी धारावीचा पुनर्विकास करत आहे. मुंबई कुणाही खासगी व्यक्तीला आंदण दिली जाणार नाही. त्यामुळे येथील जमीन कुणीतरी लाटेल ही शक्यताच नाही, असे सांगत विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आम्ही प्रत्येक धारावीकराला घर देणार आहोत सर्वांची काळजी घेणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी धारावी आणि घाटकोपर येथे जाहीर सभा घेतल्या. धारावीच्या सभेत मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह आमदार तमिळ सेल्वन, रवी राजा यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते. तर, घाटकोपर येथील सभेस भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार राम कदम यांच्यासह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुर्नविकास झाला पाहिजे अशी भूमिका 35-40 वर्षापूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असताना मांडली गेली होती. पण त्यानंतर इतकी वर्षे निघून गेली पण काहीच झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार येताच आम्ही धारावीच्या पुर्नविकासाचा विषय हाती घेतला आहे. यासाठी रेल्वेसह इतर विभागाची जमीन मिळवली आहे. धारावीतील सर्व पात्र लोकांना धारावीतच घर देणार. उद्याने, मैदानांसह सर्व सेवा-सुविधा धारावीकरांना उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व घटकांना, व्यावसायिकांना सामावून घेऊनच पुर्नविकास केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावीकरांना दिली.
धारावीचा विकास करताना उभ्या झोपड्यांसारखी घरे द्यायची, असला विचार आमचा नाही. तर, एखाद्या खासगी सोसायटीच्या तोडीसतोड सोयीसुविधा इथे निर्माण केल्या जातील. देखभाल खर्चही भरावा लागणार नाही, अशी व्यवस्था केली आहे.
घरांसोबत खेळाची मैदाने, बागाही असतील. पात्र आणि अपात्र लोकांना घरे देतानाच धारावीतील जे व्यवसाय आणि उद्योग आहेत तेही इथेच उभारले जातील. घरे धारावीत आणि उद्योग बाहेर, असला प्रकार घडणार नाही. येथे जे पारंपारिक व्यवसाय सुरु आहेत अशांना याच ठिकाणी व्यावसायांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, या व्यावसायांना पहिली पाच वर्षे कोणताही कर भरावा लागणार नाही, सर्व प्रकारचे कर माफ केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काही लोक चुकीचा प्रचार करत आहेत. धारावीकरांची जमीन कुणाला तरी खासगी व्यक्तीला दिली जाईल असे सांगत आहेत. पण धारावी पुर्नविकास प्रकल्प हा राज्य ससरकार, एसआरए यांची भागीदारी असलेल्या डीआरपीएल कंपनीमार्फत होत आहे. ही कंपनी राज्य शासनाची आहे म्हणजे तुमची, आमची जनतेची आहे. त्यामुळे या प्रकल्पातील जमीन कुणीतरी लाटेल अशी कोणतेही शक्यता नाही. जमीन विकून टाकतील असे सांगणाऱ्यांना एवढेच विचारा एवढ्या वर्षात आमच्यासाठी काय केले.
ठाकरेंचा हिंदुत्वाचा घोटाळा
मुंबईत रस्त्यापासून कर्च़यापर्यंत आणि मिठी नदीपासून कोविडच्या रेमडेसीवीरपर्यंत घोटाळे करर्ण़ाया उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा घोटाळा सुरू केला आहे. ठाकरे बंधुंची नाशिकमध्ये सभा झाली. तिथल्या भाषणाची सुरूवात करताना माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणत केली. मुंबईत मात्र हिंदू शब्द सोडून दिला, इथे माझ्या राष्ट्रभक्त बांधवांनो म्हणत भाषणाची सुरूवात करतात. मुंबईत हिंदू म्हणायची लाज वाटते की मतांचे लांगुलचालन करण्यासाठी हिंदू शब्द काढला, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घाटकोपर येथील सभेत ठाकरे बंधुंवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, जेंव्हा अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करत होते तेंव्हा काही धार्मिक शक्ती त्यांना पाठिंबा देत होत्या. अशा काळात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत हिंदुत्वाचा स्वीकार केला. तेंव्हा हिंदुत्वाचा हुंकार भरण्याचे काम शिवसेना-भाजप युतीने केले. पण, आता पाकिस्तानचा झेंडा फडकाविणाऱ्या, भारतविरोधी भाषा करणाऱ्या रशीद मामुला पक्षात घेण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. आता ज्यांनी आपला रंग बदलला आहे ते अंगावर भगवे वस्त्र दाखवत असले तरी ते भगवे राहिले नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
घरच्या घरी दिलेल्या मुलाखतीत ठाकरे म्हणाले की , मातोश्रीचा दरवाजा उघडायचा असेल तर मातोश्रीवर बोलणे सोडावे, अशी विधाने आली. पण, मी कधी मातोश्रीवर बोललो नाही. मात्र, मी मुंबईकरांच्या ह्रदयाचा दरवाजा उघडला आहे, आता कुठल्याच दरवाजाची मला अपेक्षा नाही. मुंबईकरांच्या ह्रदयाचा हा सर्वात महत्वाचा दरवाजा उघडला आहे, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे यांना उत्तर दिले.