

मुंबई : नरेश कदम
भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांची मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार टक्कर सुरू असली तरी महापालिकेची चावी कोणाच्या हाती असेल हे राज ठाकरे यांची मनसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी भाजपप्रणित महायुती आणि ठाकरे बंधूंची युती यांच्यात तगडा संघर्ष सुरू आहे. 2017 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेने 84 आणि भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात दिली. मात्र यावेळी भाजपसोबत उद्धव ठाकरे गट राज्याच्या सत्तेत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सत्तेचा दरवाजा उघडणारी चावी ही ज्याच्याकडे 114 नगरसेवकांचे संख्याबळ असेल त्याच्या हाती असेल.
भाजप 137 जागा लढवत असून शिंदे गट 90 जागांवर लढत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट 150 पेक्षा जास्त जागा लढत असून मनसेचे 53 जागांवर उमेदवार उभे आहेत. भाजप 137 जागा लढवत असल्याने एकट्या 114 जागा जिंकेल अशी परिस्थिती नाही. 2017 मध्ये 82 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यात थोडी वाढ होऊ शकेल पण शिंदे गटाने 20 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची गरज आहे. तरच भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या येतील. त्यासाठी शिंदे गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे वगळले तर भाजपसाठी दुसरा मित्रपक्ष मुंबईत नाही. अजित पवार गट वेगळा लढत असून माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे आहे. पण मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा भाजप कसा घेणार ? असा सवाल अजित पवार गटाचे नेते करत आहेत.
उद्धव ठाकरे गटाला सत्तेवर येण्यासाठी 80 पेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत. तेव्हा मनसेला 20 पेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत. उद्धव ठाकरे गटाला काँग्रेसचाही पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला सत्तेसाठी काँग्रेसचा मोठा आधार आहे. निकालात आकडे कसे पडतात , यावर दोन्ही बाजूंचे भवितव्य अवलंबून आहे.