EX DGP Sanjay Pandey | फडणवीसांना गुन्ह्यात गोवण्याचे प्रकरण; माजी डीजीपी पांडे सूत्रधार

विशेष तपास पथकाचा अहवाल; गुन्हा दाखल करण्याची शिफारस
EX DGP Sanjay Pandey
EX DGP Sanjay Pandey | फडणवीसांना गुन्ह्यात गोवण्याचे प्रकरण; माजी डीजीपी पांडे सूत्रधार
Published on
Updated on

मुंबई : बोगस नागरी कमाल जमीन धारणा प्रमाणपत्र घोटाळ्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी या फेरतपासाचे आदेश देऊन संबंधित पोलिस अधिकार्‍यांवर दबाव आणला होता, हे पोलिसांच्या विशेष तपासाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. हा अहवाल राज्याच्या माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या काही दिवस आधी गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे सूत्रधार पांडे यांच्यासह तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस विशेष तपास पथकाने केली आहे. 2024 मध्ये खंडणीप्रकरणी पांडे आणि इतरांविरुद्ध दाखल गुन्ह्यात जबाब देताना सरदार पाटील यांनीही फडणवीस यांना गोवण्यासाठी आखलेल्या कटाची कबुली दिली आहे. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशावरून बोगस नागरी कमाल जमीन धारणा प्रमाणपत्र घोटाळ्यात मीरा-भाईंदर पालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, नगरविकासमंत्री यांच्या सहभागाची चौकशी केली. परंतु, त्यात काहीही आढळले नाही. मात्र, लक्ष्मीकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच फडणवीसांच्या सहभागाबद्दल चौकशी केल्याचा जबाबही त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याचे प्रयत्न सरकारमधील काही नेत्यांच्या आदेशाने झाले होते. पांडे हे पोलिस महासंचालक झाल्यावर त्यांनी या प्रकरणात खास लक्ष घातले. ठाणे आणि मुंबई सायबर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांत फडणवीस यांना गोवण्यासाठी संबंधित पोलिस अधिकार्‍यांवर पांडे यांनी दबाव आणला होता. ही बाब उघडकीस आली आहे.

ठाणे नगर पोलिस ठाण्यात 2016 मध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. विकसक संजय पुनमिया आणि अग्रवाल या एकेकाळच्या भागीदारांतील वादातून दाखल गुन्ह्यात 2017 मध्ये आरोपपत्रही दाखल झाले होते. परंतु, तरीही या गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश पांडे यांनी दिले. याच काळात 2016 मधील गुन्हा फेरतपासासाठी घेऊन 2021 ते जून 2024 पर्यंत आपला छळ केला व खंडणी मागितली, अशी तक्रार पुनमिया यांना ठाणे नगर पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पांडे यांच्यासह सातजणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने 2016 मध्ये अडकविण्याचा कसा प्रयत्न झाला, असा मुद्दा विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता. याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे घोषित करण्यात आले. या पथकाने आपला अहवाल राज्याच्या तत्कालीन पोलिस महासंचालक शुक्ला यांना सादर केला. शुक्ला यांनी हा अहवाल कारवाईसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे.

फडणवीस आणि शिंदे यांना ठाणे नगर गुन्ह्यात अटक करण्यासाठी पांडे यांनी प्रचंड दबाव टाकला होता, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. सरदार पाटील त्यावेळी वापरत असलेल्या सरकारी गाडी वापराच्या नोंदवहीतील 5 मे 2021 ते 21 मे 2021 या काळातील पाने गायब असणे, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रकार असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांनी फडणवीस आणि शिंदे यांना गुन्ह्यात गोवण्यासाठी प्रचंड दबाव आणला, असा जबाब संजय पुनमिया, दिलीप घेवारे, राजू शहा, सुनील जैन यांनी विशेष तपास पथकाला दिल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news