

मुंबई : महिला प्रीमियर लीगमधील (डब्ल्यूपीएल) पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये बुधवारी (दि. 14) लढत होणार आहे. यूपी वॉरियर्स संघाला आघाडीच्या फळीतील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सचे लक्ष्य पॉवरप्लेमधील गोलंदाजी सुधारण्यावर असेल. ही लढत सायंकाळी साडेसात वाजता खेळवली जाणार आहे.
मागील तीन हंगामातील उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखालील सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. हंगामाची सुरुवात असली तरी, रॉड्रिग्ज आणि संघाला विजयाच्या ट्रॅकवर येण्याची नितांत गरज आहे. पहिल्या दोन सामन्यांत पॉवरप्लेमधील त्यांची गोलंदाजी कमकुवत राहिली असून, पुढील सामन्यात याच क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर असेल.
दिल्लीसाठी आतापर्यंत गोलंदाज श्री चरणी आणि नंदनी शर्मा यांची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. विशेषतः रविवारी हॅट्ट्रिक घेतलेल्या नंदनीचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. दुसरीकडे, यूपी वॉरियर्सला पॉवरप्लेमध्ये फलंदाजी सुधारण्याची आवश्यकता आहे. मागील 2 सामन्यांत कर्णधार मेग लॅनिंगसोबत हरलीन देओल आणि किरण नवगिरे यांनी सलामीला फलंदाजी केली, मात्र, हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले नाहीत. संघ व्यवस्थापनाला लॅनिंगसाठी योग्य सलामीचा जोडीदार निश्चित करून त्याला पुरेशी संधी द्यावी लागेल.
दिल्ली कॅपिटल्स : जेमिमा रॉड्रिग्ज (कर्णधार), शफाली वर्मा, मार्झियान कॅप, निकी प्रसाद, लॉरा वोलवार्ड, चिनल हेन्री, श्री चरणी, स्नेह राणा, लिझेल ली, दिया यादव, तानिया भाटिया, ममता मदिवाला, नंदनी शर्मा, लुसी हॅमिल्टन, मिन्नू मणी, ॲलाना किंग.
यूपी वॉरियर्स : मेग लॅनिंग (कर्णधार), श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, फोबी लिचफिल्ड, किरण नवगिरे, हरलीन देओल, क्रांती गौड, आशा शोभना, डियांड्रा डॉटिन, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, क्लो ट्रायॉन, सुमन मीना, जी. त्रिशा, प्रतीका रावळ, चार्ली नॉट.
दिल्ली कॅपिटल्स महिला वि. यूपी वॉरियर्स महिला
वेळ : सायंकाळी 7.30 वाजता