

विरार : वसईविरार महानगरपालिका हद्दीत तब्बल 29 हजार दुबार मतदार असल्याची गंभीर बाब समोर आली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेदरम्यान ही माहिती उघडकीस आली आहे. तपासणीदरम्यान काही मतदारांची नावे एकाच प्रभागात दोन वेळा तर काहींची नावे वेगवेगळ्या प्रभागांत नोंदलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुबार नोंदी आढळल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या 29 हजार दुबार मतदारांपैकी आतापर्यंत सव्वा हजार मतदारांकडून हमीपत्रे घेण्यात आली आहेत. मात्र उर्वरित मोठ्या संख्येने मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सापडत नसल्याचे प्रशासनाच्या तपासणीत समोर आले आहे. अनेक ठिकाणी मतदार स्थलांतरित झालेले असून काही ठिकाणी पत्ते अपूर्ण किंवा अस्तित्वात नसल्याचेही आढळले आहे. त्यामुळे मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.
महापालिका प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा दुबार नोंद असलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील असली तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर मतदार बेपत्ता असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दुबार नोंद आढळल्यास संबंधित मतदाराची फक्त एकच नोंद वैध ठेवून उर्वरित नोंदी रद्द करण्यात येतात. मात्र मतदारच सापडत नसल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
वसई-विरारसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात मतदार यादी अद्ययावत ठेवणे ही प्रशासनासाठी मोठी कसरत ठरत आहे. 29 हजार दुबार मतदार आणि त्यातील बहुसंख्य मतदार सापडत नसणे ही बाब केवळ प्रशासकीय त्रुटी नसून, लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठीही गंभीर इशारा मानला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादी पूर्णतः शुद्ध होईल का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.