

बोईसर : तारापूर औद्योगिक परिसरालगतच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहिसर येथे सोमवारी सायंकाळी बिबट्याने बकरीवर हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना घडली असून, राणीशिगाव येथेही अशाच प्रकारचा हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
तारापूर जवळील सावराई, पाचमार्ग, तारापूर तर्फे दहिसर तसेच राणीशिगाव या परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. सोमवारी सायंकाळी दहिसर येथील मनोज राऊत यांच्या मालकीच्या बकरीवर बिबट्याने अचानक हल्ला करून बकरी ठार केल्याची घटना समोर आली आहे. याचदरम्यान राणीशिगाव परिसरातही बिबट्याने बकरीवर हल्ला केल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचा वावर नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर मृत बकरीचा पंचनामा करून नुकसानभरपाईसाठी आवश्यक अहवाल वनविभागामार्फत पुढे पाठविण्यात आला आहे. वनविभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, लहान मुलांनी घराबाहेर एकटे फिरू नये तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकत्रितपणेच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेच्या ठिकाणी बिबट्याचा माग काढण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले असून, रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. बिबट्याचे नेमके लोकेशन अद्याप ट्रेस होत नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
बिबट्याचे लोकेशन नेमके ट्रेस होत नसले तरी खबरदारी म्हणून घटनेच्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच रात्रीची गस्त वनविभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
अपेक्षा साटम, वनक्षेत्रपाल, वनपरिक्षेत्र बोईसर.