

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्रातील 2869 वॉर्डामध्ये येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत असून, भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 148 जागा लढवत भाजपने 132 जागा जिंकल्या होत्या. लढवलेल्या जागा जिंकण्यात 85 टक्के स्ट्राईक रेट असलेल्या या पक्षासमोर आता या यशाची पुनरावृत्ती करण्याची नव्हे तर पक्षावर महानगर क्षेत्रात विस्तारण्याची जबाबदारी आहे.
स्थापनेनंतर महाराष्ट्रात जेमतेम 6 टक्के मते मिळवू शकणारी भारतीय जनता पक्ष नावाची राजकीय पार्टी आता 25 % मते ओलांडून पहिला क्रमांक मिळवत असते, 2014 साली भाजप विधानसभेत स्वबळावर लढला तेव्हा 28 टक्के जनतेने त्यांना पसंती दिली होती. आता भाजप ज्या विधानसभा मतदारसंघात लढते तेथे कमळ चिन्हावर 52 टक्के जनता मते देते. 2014 साली आलेली मोदी लाट महाराष्ट्रात भाजपला एका उंचीवर घेऊन गेली.
गेल्या वेळी 2014 साली झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये 2736 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 1999 जागा जिंकल्या होत्या. अर्ध्यापेक्षाही जास्त. नागपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, नाशिक, धुळे, जळगाव, पिंपरी-चिंचवड, पुणे, अमरावती, अकोला, सांगली-मिरज-कुपवाड या शहरात भारतीय जनता पक्षाला स्वबळावर महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा कौल मिळाला होता. बारा महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. शिवसेना त्यावेळी अविभाजीत होती. ठाणे येथे शिवसेनेची सत्ता 131 पैकी 67 ठिकाणी स्थापन झाली होती. ही कामगिरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरेंपासून वेगळे होत भाजपला टाळी दिली आहे. भारतीय जनता पक्षाला या सहकार्याला समवेत घेऊन जायचे आहे.
सध्या भारतीय जनता पक्षातील 138 आमदार त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला जिंकवून कसे देता येईल याच्या आखणीमध्ये मग्न आहेत. पूर्वी भाजपने माधव-धनगर-वंजारी अशी माधव रणनीती आखली होती. एकेकाळी काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्राचे राजकीय चित्र आता पुरते बदलले असून तेथे भारतीय जनता पक्ष हा मुख्य पक्ष झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची संबंध तोडत गेल्या निवडणुकीवेळी जोरदार लढत दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेने 84 तर भारतीय जनता पक्षाने 82 जागा जिंकल्या होत्या. राज्यातील महापालिकांमध्ये पुन्हा अव्वल ठरण्यासाठी या वेळी ते शिवसेनेसह ठाकरेंना किती आव्हान देऊ शकतील ते पाहावे लागेल.
केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आपण नेत्यांना जिंकवतो, आता आम्हाला संधी द्या, नगरसेवक होऊ द्या ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला तिकिटे वाटताना त्रास झाला. नाराजांच्या फौजा वाढल्या. येत्या काळात पुढच्या निवडणुकीत स्वतःचे वर्चस्व सांभाळून ठेवण्यासाठी कार्यकर्ते समवेत ठेवणे हे अतिशय मोठे आव्हान आहे. बाहेरून आलेल्यांना मिळणारी संधी, त्यांना मिळणारी पदे हा मोठा आव्हानाचा विषय ठरला आहे.