

ओरोस : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित करणारा, मुलींना शालेय शिक्षण मुलींना गैरसोयीचा ठरणारा शासनाने 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा. जिल्ह्यातील 38 शाळा बंद झाल्या असून काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यावर लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चा काढून विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ मंच सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला 97 वर्षीय ज्येष्ठ महिला सुमती विष्णू परब यांच्या हस्ते पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलेला मोर्चा विविध जिल्हाभरातील शाळा, संस्था प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. अनेक शाळांमधील मुले, मुली शालेय गणवेशामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या हातात घोषवाक्ये लिहिलेले फलक होतेे आणि ते जोरदार घोषणा देत हेोते. ‘शाळा वाचवा’, अशी आर्त हाक ते शासनाला देत होते. यावेळी अनेक लोकप्रतिनिधी, गावोगावचे सरपंचसुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते.
कोकणाला विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळा डोंगरी दुर्गम भागाचा निकष लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्याशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून आपल्या संघटनेशी चर्चा केली जाईल आणि यावर सकारात्मक निर्णय घेऊ. कोणती शाळा बंद होणार नाही किंवा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची आम्ही नव्हे आपण सर्वांनी मिळून जबाबदारी घेऊया, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य, बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी मोर्चाला सामोरे जात दिली.
कोकणासाठी डोंगराळ जिल्हा सिंधुदुर्ग असल्याने वेगळा निकष कसा लावता येईल यादृष्टीने उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा घडवून आणू आणि येत्या काही दिवसांत यावर सकारात्मक निर्णय घेऊ. जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही. साक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथील विद्यार्थी, मुली शिक्षणापासून वंचित होणार नाही याची आम्ही दखल घेऊ, अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मोर्चाला पालकमंत्री नितेश राणे सामोरे गेले.