BJP leader CR Patil statement Chhatrapati Shivaji Maharaj
सुरत : "छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते" असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील उर्फ चंद्रकांत पाटील यांनी सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकांचे रणकंदन सुरू असतानाच त्यांनी हे विधान केले आहे.
पोलीस शिपाई ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री, असा सी. आर. पाटील यांचा राजकीय प्रवास आहे. गुजरात भाजपचे वजनदार नेते म्हणून चंद्रकांत रघुनाथ पाटील ऊर्फ सी. आर. पाटील यांची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यातील पिंपरी अकराऊत हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील रघुनाथ पाटील हे पोलीस दलात कार्यरत होते. १९५३ मध्ये त्यांचे कुटुंब वास्तव्यास गुजरातमध्ये गेले. सी. आर. पाटील यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात वडिलांप्रमाणेच पोलीस शिपाई म्हणून केली. त्यांनी सुमारे १४ वर्षे पोलीस दलात सेवा बजावली, मात्र शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्यांना सेवेतून मुक्त व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी नवगुजरात टाईम्स नावाचे दैनिक सुरू केले होते. १९८९ मध्ये त्यांनी पोलीस दलातील नोकरी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
या विधानावर प्रतिक्रिया देताना इतिहास अभ्यासक संजय सोनावणी यांनी स्पष्ट केले की, या विधानाला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची ओळख 'मराठा' अशी केलेली आहे. महापुरुष हे कोणत्याही एका विशिष्ट जाती-पातीचे नसून ते संपूर्ण समाजाचा वारसा असतात. त्यांना अशा प्रकारे जातीत वाटून संकुचित करणे आणि त्यांना छोटं करण्याचा प्रयत्न करणे हे निषेधार्ह आहे. अशा प्रकारचे बिनबुडाचे विधान करणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. केवळ सामाजिक किंवा राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करणे चुकीचे आहे, असे सोनावणी यांनी म्हटले आहे.
अशा विधानांमुळे समाजात विनाकारण मानसिक तेढ निर्माण होतो आणि इतिहासाचा दृष्टिकोन बदलल्यामुळे अंतिमतः इतिहासाचे नुकसान होते. महापुरुषांना विशिष्ट जातीच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणे हे देशाच्या संकुचित स्वरूपाचे लक्षण असून ते अत्यंत चुकीचे आहे, असेही सोनावणी यांनी म्हटले आहे.