

दाबोळी : भारत बलाढ्य सागरी राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. हिंदी महासागर क्षेत्रामध्ये स्थिरता, सहकार्य व नियमाधारित व्यवस्था सुनिश्चित करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची होत चालल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. दरम्यान, भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास चेहरामोहराच बदलून टाकू, असा इशाराही त्यांनी नाव न घेता पाकिस्तानला दिला आहे.
गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या दोन मालिकेतील पहिले व भारतीय तटरक्षक दलाचे सर्वात मोठे प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामावून घेण्याच्या सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार कॅ. विरिएतो फर्नांडिस, आमदार कृष्णा साळकर, संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी, गोवा ‘समुद्र प्रताप’ जहाजाचे प्रमुख व उपमहानिरीक्षक अशोककुमार भामा, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय उपस्थित होते.
मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘समुद्र प्रताप’कडे पाहिले असता सर्व काही स्पष्ट होते. जहाजे ही पोलाद, तंत्रज्ञानाचे मिश्रण नसून, ती जनतेच्या विश्वासाची व सशस्त्र दलांच्या अपेक्षा व गरजांची प्रतीके आहेत. ब्रजेशकुमार उपाध्याय यांनी गोवा शिपयार्डच्या कामगिरीचा व चढत्या आलेखाचा आढावा घेतला. भविष्यात आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियासारख्या उपक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले. महासंचालक परमेश शिवमणी यांनी तटरक्षक दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला. भारतीय तटरक्षक दलाचे काम आता किनारपट्टीपुरते मर्यादित नसून, त्याची व्याप्ती वाढली असल्याचे ते म्हणाले.
114.5 मीटर लांबीच्या या जहाजात 60 टक्के स्वदेशी घटकांचा समावेश
भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे हे प्रदूषण नियंत्रण जहाज
जहाजाचे वजन 4,200 टन आहे आणि त्याचा वेग 22 नॉटस्पेक्षा जास्त
दाबोळी ः भारतीय तटरक्षक दलाचे ‘समुद्र प्रताप’ जहाज.
दाबोळी : ‘समद्र प्रताप’ जहाजाला तटरक्षक दलात सामावून घेण्याच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह. बाजूला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.