

Bhavesh Kaware New Video : मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे चर्चेत आला होता. आता त्याने महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, असे सांगणारा व्हिडिओ पोस्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, असा दावा करणाऱ्या रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे याच्या कथित व्हिडिओवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. या व्हिडिओमध्ये कावरे एका फ्लॅटची माहिती देताना, ग्राहक मांसाहारी असल्यास ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, तर शाकाहारी असल्यास घर मिळू शकते, असे सांगताना दिसत होता. त्यामुळे घर देताना व्यक्तीच्या खाद्यपद्धतीचा विचार का केला जात आहे? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित झाला. यानंतर भावेश कावरेने स्पष्टीकरणही दिले होते.
भावेश आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मुंबईत मराठी माणसांसाठी घर दाखवताना दिसत आहे. महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, असे म्हणत मुंबईतील सर्व म्हणजे सेंट्रल, वेस्टर्न, हार्व्हर लाईनमध्ये घर उपलब्ध असल्याचे तो सांगतो. तसेच मराठी बांधवांना आणि बहिणींना जर मुंबईमध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल तर भावेश कावरेला विसरू नका, असे आवाहनही तो करत आहे.
ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना भावेश कावरेने सांगितले होते की, संबंधित फ्लॅट एका मराठी व्यक्तीचा होता. त्या घरमालकाची इच्छा होती की फ्लॅट शाकाहारी कुटुंबाला विकला जावा. मालकाची हीच इच्छा आपण व्हिडिओमध्ये सांगितली होती.