

Anjali Damaniya on Ademia case : अजित पवार यांच्या मुलाने जमीन खाऊनसुद्धा त्याचे नाव 'एफआयआर'मध्ये नाही. एफआयआरमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचे नाव आहे. दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली. यानंतर तो बहरीनला गेला आहे. आता त्याची पुढील चौकशी कशी होणार? हे नक्की काय चाललं आहे, असा सवाल करत जमीन घोटाळा प्रकरणी सध्या चौकशीच्या नावाखाली महाराष्ट्रात मोठा फार्स सुरू आहे. माध्यमांनी बातमी दाखवूनसुद्धा काहीही होताना दिसत नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना जनाची नाही तर किमान मनाची लाज असेल तर राजीनामा द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसाठी कायदा समान नाही का, असा सवाल करत पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या मुलावर गुन्हाच दाखल झालेला नाही. विरोधी पक्ष जर जागा असेल तर थोडा आवाज उठवावा. पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये घातले गेले पाहिजे. खरगे समितीचा अहवाल आला असता तर अजित पवारांचा राजीनामा झाला असता. या समितीलाच एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये आले तर अजित पवारांनी जनाची नाही किमान मनाची लाज बाळगून नैतिकतेच्या आधारावर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी दमानिया यांनी केली. अमेडिया प्रकरणी आजवर झालेल्या तपासाचा तपशील जाहीर करावा, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले.
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटील याची चौकशी झाली. यानंतर तो बहरीनला गेला आहे. आता त्याची पुढील चौकशी कशी होणार? महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे? हे नक्की काय चाललं आहे, असा सवाल करत जाणीवपूर्वक जाऊ दिले आहे का? ज्या अधिकाऱ्याने आरोपीला पळून जाण्यास मदत केली त्याला देखील जबाबदार धरले पाहिजे. या प्रकरणी प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गौरी गर्जे मृत्यूनंतर आम आदमी पार्टीचा माणूस जो पंकजा मुंडेंचा खास आहे, तो फॉरेन्सिकमध्ये गेला होता. या प्रकरणी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. गौरी गर्जे यांच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घेऊन जाणार आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
सध्याच्या परिस्थितीत फक्त काँग्रेस पक्षच विरोधाची भूमिका सक्षमपणे पार पाडताना दिसत आहे. त्यांनी इतर विरोधी पक्षांना देखील सक्रिय होऊन लढण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नाशिकमधील 'तपोवन' येथील झाडांच्या विषयावर बोलताना दमानिया म्हणाल्या की, भाजप नेते गिरीश महाजन तिथे षडयंत्र करत आहेत. नाशिकची जनता... झाडांसाठी लढत आहे... छोटी छोटी मुले झाडांसाठी लढत आहेत. हा केवळ नाशिकचा विषय नसून, ताकदीने लढणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर बोलताना त्यांनी पोलीस अधिकारी सदानंद दाते यांचा उल्लेख केला आणि मुंबई पोलिसांची पूर्वीची प्रतिष्ठा परत आणावी. त्यांनी स्कॉटलंड यार्डचे स्टेटस पुन्हा आणावे, असेही दमानिया म्हणाल्या.