

मुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा हा एक गंभीर विषय असून, सरकारने त्याबाबत चौकशी करून संपूर्ण वस्तुस्थिती जनतेपुढे मांडली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले आहे. न्याय सर्वांसाठी समान असला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले आहे. यासंबंधी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये पार्थ यांचे नाव कसे नाही, याचे उत्तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतील, असे खा. पवार म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांची पाठराखण केली असल्याचा मुद्दा निदर्शनाला आणून दिला असता शरद पवार म्हणाले, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. मला या जमीन व्यवहाराबद्दल कसलीही माहिती नाही. माहिती घेतल्यानंतरच यावर बोलता येईल.
कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर आरोप होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व्यवहार झालाच नाही, असे म्हणत असतील तर तो रद्द करण्याची वेळ कशी आली, असा संतप्त सवाल ‘उबाठा’ शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. पवारांचे हे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. पार्थ पवार हे त्यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीने केलेल्या पुण्यातील महार वतनाची सरकारी जमिनीच्या व्यवहारप्रकरणी चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना विरोधकांकडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराचे प्रकरण समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर, कोट्यवधीची जमीन बळकावणारा सूत्रधार मंत्रालयात असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सोबतच, सरकारने राज्यातील सर्वच जमीन व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुणे-मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत मोक्याचे भूखंड कवडीमोल दराने विकले जात आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात या विषयावर एक दिवस चर्चा घडवून आणावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
आधी पक्षचोरी, मग मतचोरी आणि आता तर हे जमिनीचीही चोरी करायला निघाले आहेत, असा टोला ‘उबाठा’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवठाकरे यांनी महायुती सरकारला लागावला आहे. परभणी जिल्ह्यातील ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री याप्रकरणी समिती नेमतील आणि संबंधितांना क्लीन चिट दिली जाईल.