

MLAs from Ajit Pawar's NCP seek a meeting with Sharad Pawar
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील काही नाराज आमदारांनी थेट शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने राज्यात राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नाराज आमदारांनी बुधवारी भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी सांगितले.आता शरद पवार या नाराज आमदारांना भेटीसाठी वेळ देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
नुकतीच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यापाठोपाठ आता थेट आमदारांनीच भेटीसाठी पुढाकार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नुकतेच शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. सध्या ते मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत असून, डॉक्टरांनी त्यांना थेट भेटीगाठींसाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी शरद पवारांकडे बुधवारी भेटीसाठी वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शरद पवार किंवा त्यांच्या कार्यालयाशी या आमदारांचा अद्याप कोणताही थेट संपर्क झालेला नाही. तसेच डॉक्टरांनीही शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता तब्येतीचे कारण पाहता शरद पवार या नाराज आमदारांना भेटीसाठी वेळ देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.