

Sharad Pawar Health Update
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (दि. ७) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास आणि छातीत संसर्ग झाला होता. उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉ. प्रीतम समदानी यांनी सांगितले की, शरद पवार उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. वयाचा विचार करता, त्यांना औषधोपचार सुरू ठेवण्याचा आणि काही अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
"शरद पवार यांना स्थिर प्रकृतीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते घरी राहून पुढील उपचार घेतील. त्यांना ब्रॉन्कायटिस आणि छातीत संसर्गाचा त्रास झाला होता. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. त्यांना घरी औषधोपचार सुरू ठेवण्यास आणि सर्वसामान्य नागरिकांनी पाळाव्यात अशा सर्व खबरदारीच्या पालन करण्यास सांगितले आहे. ते स्वतःची उत्तम काळजी घेतील," असे डॉ. प्रीतम समदानी यांनी सांगितले.
पवार यांना २ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते आणि ४ नोव्हेंबर रोजी त्यांना तिथून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, पुढील उपचारांसाठी त्याच दिवशी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली होते.
रुग्णालयात असताना अनेक राजकीय नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील, उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांशी फोनवर चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) ब्रीच कँडीमध्ये जाऊन शरद पवार यांची विचारपूस केली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले होते की, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा करत असून त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आहेत. रुग्णालयात दाखल असतानाही पवारांनी शेतकरी, दुष्काळग्रस्त भाग आणि सातारा व महाबळेश्वरसह महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणारी पाणीटंचाई यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.