मुंबई ; पुढारी वृत्तसेवा: संतोष परब हल्ला प्रकरणी वादाच्या भोवर्यात अडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना आज दोन दिवसाचा दिलासा मिळाला. आम्हाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्या, अशी विनंती विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी केली. तोपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई करणार नाही, अशी तोंडी हमी न्यायालयाला दिली. याची दाखल घेत न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी अर्जाची सुनावणी शुक्रवारी होईल, असे स्पष्ट केले. .
संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने ३० डिसेंबर २०२१ रोजी फेटाळला होता. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन फेटाळला होता. राणे यांच्यावतीने अॅड शुभदा खोत यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केला होता. यावर न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्या समोर आज सुनावणी झाली.
यावेळी पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी नितेश राणे यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. नितेश राणे हेच हल्ल्याचे सूत्रधार आहेत. याप्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती न्यायालयाला केली. राणे यांच्या वतीने जेष्ठ वकील अँड नितीन प्रधान यांनी तूर्तास तरी अटकेपासून दिलासा द्या, अशी विनंती केली. यावेळी तूर्तास तरी कठोर कारवाई करणार नाही, अशी तोंडी हमी सरकारने दिली. याची दाखल घेत न्यायालयाने अर्जाची सुनावणी शुक्रवार ७ जानेवारी दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी होईल, असे स्पष्ट केले.
हेही वाचलं का?
: