१५ वर्षांवरील मुलांच्‍या लसीकरणाला प्रारंभ; केंद्राच्‍या सुचनांनुसारच हाेणार लसीकरण : आरोग्‍यमंत्री टाेपे | पुढारी

१५ वर्षांवरील मुलांच्‍या लसीकरणाला प्रारंभ; केंद्राच्‍या सुचनांनुसारच हाेणार लसीकरण : आरोग्‍यमंत्री टाेपे

मुंबई: पुढारी ऑनलाईन
राज्यात आज 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ झाला. जालना येथे आरोग्‍यमंत्री व जिल्‍ह्याच्‍या पालकमंत्री राजेश टोपे यांच्‍या उपस्‍थितीत लसीकरणाला प्रारंभ झाला. कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या मुलांचेच राज्यातील सहाशेहून अधिक केंद्रांवर मोफत लसीकरण होणार आहे. मुंबईत 9 लसीकरण केंद्रांवर लहान मुलांना लस दिली जाईल. यासाठी 1 जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने मुलांच्या लसीकरणासाठी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव्ह-डी’ या दोन लसींना परवानगी दिली आहे. प्रत्येक मुलाला ‘कोव्हॅक्सिन’चे दोन, तर ‘झायकोव्ह-डी’चे तीन डोस घ्यावे लागतील.

केंद्र सरकारच्‍या सुचनांनुसार लसीकरणाला प्रारंभ : आरोग्‍यमंत्री टोपे

जालना येथे आरोग्‍यमंत्री व जिल्‍ह्याच्‍या पालकमंत्री राजेश टोपे यांच्‍या उपस्‍थितती लसीकरण मोहिलेला प्रारंभ झाला. यावेळी टोपे म्‍हणाले की, 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण आजपासून सुरु झाले आहे. लस घेण्‍यासाठी मुले खूप उत्‍साही आहेत. केंद्र सरकारच्‍या सुचनानुसार हे लसीकरण होणार आहे. यासाठी स्‍वतंत्र नोंदणी करणे आवश्‍यक आहे. तसेच लस घेतल्‍यानंतर मुले काही काळ निरीक्षणात ठेवण्‍यात येतील, यासाठीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी या लसीकरणासाठी खूप उपयोग होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.शाळेमध्‍ये लसीकरणाबाबत आतच निर्णय नाही. सुरक्षितेचा मुद्‍या लक्षात घेवूनच पुढील काळात याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

आता १२ ते १५च्‍या आतील वयोगटातील मुलांसाठीही कोरोना प्रतिबंध लस देण्‍यात यावी, अशी मागणी आम्‍ही रविवारी केंद्रीय आरोग्‍य मंत्री मांडविया यांच्‍याकडे केली, असेही त्‍यांनी सांगितले. कोरोना चाचणीसाठी केद्र सरकारने चाचणी किट माफक दरात उपलब्‍ध करावेत, अशीही मागणी केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आता जगभरात ओमायक्रॉन पसरला आहे. त्‍यामुळे आता विमानतळांवरील चाचणी कशी करण्‍यात यावी. विमानतळावर होणार्‍या आरटीपीसीआरबाबतही मार्गदर्शन करावे, अशीही त्‍यांना विनंती केल्‍याचे टोपे यांनी सांगितले.

…तरच महाराष्‍ट्रात लॉकडाउनबाबत निर्णय

लॉकडाउन संदर्भात राज्‍यनिहाय निर्णय घेतले जात आहेत. दिल्‍ली, हरियाणा सरकारने आता कडक निर्बंध लावले आहे. महाराष्‍ट्रात रुग्‍णसंख्‍या आणि ऑक्‍सिजनची उपलब्‍धता यावरच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल, असा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

मुलांच्‍या लसीकरणासाठी अशी आहे नोंदणी प्रक्रिया..

  • सर्वप्रथम कोविन अ‍ॅप (प्ले स्टोअरवरून घेता येईल) किंवा संकेतस्थळावर (https://www.cowin.gov.in) जाऊन मुलांसाठी लसीकरण या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन आयडी, पासवर्ड नसल्यास ओटीपीद्वारे लॉगिनचा पर्याय निवडा.मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे लॉगिन करा.
  • नोंदणीचे पेज खुले झाल्यानंतर सर्व माहिती नमूद करा. (आधार, पॅन कार्ड क्रमांक नसल्यास शाळेचे ओळखपत्र वापरता येईल.)
  • सदस्य जोडणीनंतर नजीकच्या क्षेत्राचा पिन क्रमांक टाका. त्यानंतर लसीकरण केंद्राची यादी खुली होईल.
  • लस, तारीख आणि वेळ निवडा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक सिक्रेट कोड तुम्हाला प्राप्त होईल. तो लसीकरण केंद्रावर दाखवावा.

‘कोव्हॅक्सिन’, ‘झायकोव्ह- डी’ लसींना मान्यता

महाराष्ट्रात 15 ते 18 वयोगटातील सुमारे 30 लाख मुले आहेत. या मुलांना टप्प्याटप्प्याने लसीकरण देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. मुलांच्या लसीकरणासाठीही शासन व महापालिका जनजागृती मोहीम हातात घेणार आहेत. सध्या तरी या मुलांना सरकारी लसीकरण केंद्रांवरच लस देण्यात येणार आहे. गर्दी होऊ नये, यासाठी मुलांच्या बॅचेस तयार केल्या आहेत. प्रत्येक बॅचेसला वेगवेगळ्या वेळा दिल्या जाणार आहेत. त्यानुसार लसीकरण केले जाणार आहे. यासाठी शाळांनी नियोजन केले आहे.

दुसरीकडे, मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागानेही तयारी केली आहे. सध्या 600 हून अधिक सरकारी लसीकरण केंद्रांवर सुमारे दीड हजार डॉक्टर व संबंधित स्टाफला प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिअ‍ॅक्शन झाली, तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रिक वॉर्डचा वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतीही गंभीर रिअ‍ॅक्शन झाली नसल्याचे निष्कर्ष आले आहेत. त्यामुळे लहान मुलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button