कोल्हापूर मध्ये पुन्हा गाठली कोरोनाची शंभरी!

कोल्हापूर मध्ये पुन्हा गाठली कोरोनाची शंभरी!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : येणार नाही, येणार नाही, असे म्हणत कोरोनाची तिसरी लाट देशात सक्रिय होऊ लागली आहे. अवघ्या आठवड्यात कोरोना उपचार घेणार्‍या रुग्णांच्या संख्येने देशात 1 लाखाचा टप्पा पार केला. महाराष्ट्रात या रुग्णसंख्येची 40 हजारांकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा एकदा शंभरी गाठली आहे.

सैल जीवनशैलीचा लौकिक असलेल्या कोल्हापूरकरांनी विशेष खबरदारी घेण्याची धोक्याची घंटा वाजते आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अत्युच्चम खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे; अन्यथा दुसर्‍या लाटेप्रमाणे तिसर्‍या लाटेतही कोल्हापूरकरांना याची जबर किंमत मोजावी लागू शकते.

कोरोना रुग्णसंख्येचा आलेख, बाधित रुग्णसंख्या आणि मृत्यू यांचा एकत्रित अभ्यास केला, तर संभाव्य धोके टाळण्यासाठी काय, कोठे आणि किती खबरदारी घ्यावी लागेल, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. गणिती विज्ञानानेही याविषयी अभ्यासाचे आणखी एक क्षेत्र खुले केले आहे. याचा समग्र अभ्यास केला, तर कोल्हापूरसाठी ही धोक्याची घंटा किती जोरात वाजते आहे, याची कल्पना येऊ शकते. जेव्हा कोरोना संसर्ग सक्रिय होतो, तेव्हा देशात सर्वप्रथम मुंबई, पुणे त्याला बळी पडते, असा अनुभव आहे.

जगाच्या कानाकोपर्‍याशी संपर्क असलेल्या या दोन शहरांत प्रवाशांच्या येण्या-जाण्यातून या रोगाचे उत्परिवर्तीत विषाणू दाखल होतात. देशाच्या सरासरी 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रात असतात आणि त्याचवेळेला राज्याच्या दक्षिणेकडील शेपटीवर असलेले कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे चार जिल्हे थंड असतात. कालांतराने उत्तरेकडे संसर्ग वाढतो, मुंबई-पुण्याचा संसर्ग ओसरतो आणि मग दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण संसर्गाच्या आघाडीवर तरारून उठतो.

कोल्हापुरात डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या नीचांकी पातळीवर घसरली होती. कोरोनाचा धोका टळला, अशा रितीने खासगी रुग्णालयातील कोरोना वॉर्ड बंद झाले. शून्य कोरोना अशी स्थिती होते की काय, असे वाटत असतानाच पुन्हा शेवटच्या आठवड्यात संसर्गाने डोके वर काढले. आता दररोज दुहेरी संख्येने रुग्ण नव्याने दाखल होताना दिसताहेत. त्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णही सापडला आहे.

ही स्थिती अत्यंत संवेदनशील आहे. कारण येथूनच संसर्गाला सुरुवात होते. यामुळे खरे तर इथेच कोरोनाचे डोके ठेचण्यासाठी नागरिकांनी कंबर कसली पाहिजे, पण दुर्दैवाने आजही नागरिक सैल जीवनशैलीचे गुलाम बनलेले दिसत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news