नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत रूग्णसंख्येत तीनपटीने वाढ झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असून सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 306 वर गेली आहे, असेही केजरीवाल यांनी नमूद केले.
कोरोना वाढत असला तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की, जे नवीन रुग्ण येत आहेत, ते फार गंभीर नाहीत. असंख्य रुग्ण असे आहेत की ज्यांच्यात लक्षणेही दिसून आलेली नाहीत. दिल्ली सरकारने 37 हजार बेडसची तयारी केलेली आहे.
संक्रमण दर अर्ध्या टक्क्यांच्या वर गेल्यानंतर गत सोमवारी सरकारने यलो ऍलर्ट जारी केला होता. त्यानंतर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती.
तर मेट्रो, बसेसमध्ये प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच वाहून नेण्याची मुभा देण्यात आली होती.
यानंतरही संक्रमण दर झपाट्याने वाढू लागला असून शनिवारी संक्रमण दर 3.64 टक्के इतका होता.
सलग दोन दिवस अशीच स्थिती राहिली तर ऑरेंज ऍलर्ट जारी केला जाईल आणि त्यानंतर निर्बंध आणखी कडक केले जातील.