Piyush Jain : १२० तास तपासणीत आढळली २५७ कोटींची रोकड, अत्तर व्यापारी पीयूष जैनचा ५० हून अधिक देशांत व्‍यापार | पुढारी

Piyush Jain : १२० तास तपासणीत आढळली २५७ कोटींची रोकड, अत्तर व्यापारी पीयूष जैनचा ५० हून अधिक देशांत व्‍यापार

कानपूर : वृत्तसंस्था
अत्तर व्यापारी पीयूष जैन ( Piyush Jain ) याच्याविरोधात अप्रत्‍यक्ष कर आणि सीमा शुल्‍क बोर्डाने केलेली केलेली कारवाईत सापडलेल्‍या संपती देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल १२० तास ही कारवाई चालली. हाती लागलेली बेहिशेबी संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले. जैनकडे २५७ कोटींची राेकड आढळली. सापडलेल्या कागदपत्रांतून अन्य १६ संपत्तींबाबत माहिती उपलब्ध झाली. त्यापैकी कानपूरमध्ये ४, कनौजमध्ये ७, मुंबईत २, तर दिल्लीत १ आहे. विशेष म्हणजे, त्‍याच्‍या दुबईतही दोन मालमत्ता आहेत.

जैन याची चौकशी सलग 50 तास चालली. अखेर करचुकवेगिरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. जैन याच्या कनौज येथील घरात 18 लॉकर्स सापडले आहेत. 500 चाव्यांचा जुडगाही सापडला आहे. जैन याच्या 40 कंपन्यांचीही माहिती आयकरला मिळाली आहे.

Piyush Jain : पीयूष जैन ५० हून अधिक देशांत व्‍यापार; घरातच प्रयोगशाळा

चाैकशीत समाेर आलेल्‍या माहितीनुसार, अत्तर व्यापारी पीयूष जैन याने आपल्‍या घरातच प्रयोगशाळा तयार केली होती. रसायनांचे मिश्रण करुन तो अत्तर तयार करायचा. पीयूष जैन हा स्‍वत: रसायनांच्‍या मिश्रणातून फॉम्‍युला तयार करत असे. नवा फॉम्युला तयार झाला की तो साबण, सौंदर्य प्रसाधने, पान-मसाला आणि गुटखा कंपन्‍यांना विकत असे. यामध्‍येच तो कोट्यवधी रुपये कमवत होता. त्‍याचा व्‍यापार हा ५० हून अधिक देशांमध्‍ये होत होता, अशी माहितीही चौकशीत समोर आली आहे.

१०० हून अधिक सुंगधादित्‍य द्रव्‍य जप्‍त

पीयूष जैन याच्‍या निवासस्‍थानासह, गोडावन आणि कारखान्‍यांमध्‍ये दहा देशांतील रसायन मिळाले. तसेच देशासह विदेशातही पाठविण्‍यात येणारे १०० हून अधिक सुंगधादित्‍य द्रव्‍य जप्‍त करण्‍यात आले आहे. पीयूष जैन याच्‍या  गोडावन व कारखान्‍यांमध्‍ये कोट्यवधी रुपयांचे रसायनही आढळली. हे रासायने फ्रान्‍स, जर्मनी, ऑस्‍ट्रेलिया, जपान, चीन, कुवैत, इंडोनेशिया, नेपाळ, सौदी अरब आणि तेहरान येथून आणण्‍यात आले होते. तयार करण्‍यात आलेले रसायन हे कोणत्‍या देशांमध्‍ये पाठविण्‍यात येणार होते, याचीही माहिती समोर आली आहे.

पीयूष जैन हे मुळचे उत्तर प्रदेशमधील कन्‍नोजचे आहेत. येथे त्‍यांचा अत्तर निर्मितीचा कारखाना आहे. घरासह कोल्‍ड स्‍टोरेज आणि पेट्रोल पंपही त्‍यांच्‍या नावावर आहे. त्‍यांच्‍या काही कंपन्‍या मुंबईतही आहेत. सुमारे ते ४० हून अधिक कंपन्‍यांचे मालक आहेत. अत्तराचे मुख्‍य व्‍यापारी अशी त्‍यांची ओळख आहे.

वडिलोपार्जित सोने विक्री करुन राेकड घरी आणली : पीयूष जैन

‘एनडीटीव्‍ही’ने दिलेल्‍या माहितीनुसार, आपली सर्व संपत्ती ही वडिलोपार्जित सोने विक्री करुन जमा केली आहे. आपल्‍याला व्‍यवसायात वाढ करायची होती. त्‍यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण रोकड घरात ठेवल्‍याचा दावाही त्‍यांनी अधिकार्‍यांसमोर केला आहे. मात्र वडीलोपार्जित सोने कोणाला विकले, याचे उत्तर त्‍यांनी दिलेले नाही.

Piyush Jain : अब्‍जावधीचा धनी आणि साधी राहणी

तब्‍बल २५७ कोटींची रोकड बाळणणारा पीयूष जैन हा गावात एका जुन्‍या दुचाकीवरुन फिरत हाेता. तसेच त्‍याच्‍या कन्‍नोज येथील घरी केवळ दोन कार आहेत त्‍याही जुन्‍या. पीयुष हा खूपच साधेपणाने राहायचा. घराजवळील कोणाशीही ताे बोलत नसे. त्‍याचे वडील महेशचंद्र जैन हेही रसायनाचा उद्‍योग करायचे. अत्तर कसे तयार करायचे? हे ताे वडील महेशचंद्र आणि भाऊ अंबरीश यांच्‍याकडून शिकला.

१५ वर्षांपूर्वी पीयुष जैन यांच्‍या कुटुंबीयांचा अत्तर व्‍यवसायात एवढा बोलबाला नव्‍हता. मागील १५ वर्षांमध्‍ये त्‍याच्‍या संपत्तीमध्‍ये प्रचंड वाढ झाली. कानपूरबरोबर त्‍यांची मुंबई आणि गुजरातमध्‍ये व्‍यवसाय वाढवला. कन्‍नोजमध्‍ये त्‍याने जुन्‍या घराजवळ एक अलिशान बगलाही बांधला. हा बंगला बांधताना त्‍यांनी एक काळजी घेतली आहे ती म्‍हणजे, या बंगल्‍याच्‍या केवळ बाल्‍कनीच दर्शनी भागात आहेत. या बंगल्‍यात पीयूष जैनचे वडील महेशचंद्र जैन राहतात. पीयूष आणि त्‍यांचे बंधू अंबरिश यांना सहा मुले आहेत. सर्वजण कानपूरमध्‍ये शिक्षण घेतात.

बनावट बिलं आणि क्रेडिट कार्डचा माध्‍यमातून अब्‍जावधीची माया

वडिलोपार्जित सोने विकून संपत्ती मिळवल्‍याचा दावा पीयूष जैन करत आहेत. मात्र त्‍याने अब्‍जावधी रुपयांची बेहिशेबी संपत्ती ही बनावट बिलं आणि क्रेडिट कार्डच्‍या माध्‍यमातून तयार केली आहे. विक्री केलेल्‍या वस्‍तूंची किंमत कमी दाखवणे, विनाबिल सर्व व्‍यवहार करणे असा एकुण त्‍यांचा व्‍यवहार होता, असे अधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.  एका पान-मसाला व्‍यापार्‍याच्‍या घरावर अप्रत्‍यक्ष कर अधिकार्‍यांनी छापा टाकला होता. यावेळी पीयूष जैन यांच्‍या आर्थिक व्‍यवहाराची माहिती समोर आली. यानंतर या विभागाने त्‍यांच्‍यावर धडक कारवाई केली. यानंतर समोर आलेली संपत्तीने सारेच अवाक झाले आहेत. न्‍यायालयाने पीयूष जैन याला १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button