चेंबूर, विक्रोळी, भांडूप येथील दुर्घटनांमध्‍ये २५ जणांचा मृत्‍यू | पुढारी

चेंबूर, विक्रोळी, भांडूप येथील दुर्घटनांमध्‍ये २५ जणांचा मृत्‍यू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : चेंबूर विक्रोळी, भांडुप येथील दुर्घटनांमध्ये तब्बल २५ लोकांना जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे चेंबूर विक्रोळी, भांडुप येथील दुर्घटनांवर राष्‍ट्रपती रामनाथ काेविंद आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

चेंबूरच्या वाशी नाका येथे असलेल्या भारत नगरमध्ये बीएआरसीची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. तर विक्रोळीतील घटनेत ६ जणांचा, भांडूप आणि अंधेरी येथे प्रत्येकी १ एकाचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा 

एनडीआरएफ आणि विविध यंत्रणांकडून दोन्ही दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मुंबई मनपाने दिली आहे. दरम्‍यान, गंभीर जखमींचे प्रमाण अधिक असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वाशी नाका येथे असलेल्या भारत नगरमध्ये बीएआरसीची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळली. भिंत कोसळल्याने झोपी गेलेल्या तब्बल १७ नागरिकांवर काळाने घाला घातला आहे.  २ जणांंना उपचार करून डिस्चार्ज दिल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

अधिक वाचा

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपैकी तीन घरांवरील मलबा काढण्याचे काम सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली काही महिला व पुरुष अडकल्याची शक्यता आहे.

अग्निशामक दलाचे अधिकारी व एनडीआरएफ टीमच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.

मुंबई उपनगरातील भांडुप येथे वन विभागाची भिंत कोसळल्याने एका १६ वर्षीय युवतीला जीव गमवावा लागला आहे.

विक्रोळीतील सूर्यनगरमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुसळधारेने सहा घरांवर दरड कोसळल्याने एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

तिन्ही मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. रामनाथ तिवारी (४५), अनिकेत रामनाथ तिवारी (२३), कविता रामनाथ तिवारी (४२) अशी मृतांची नावे असून नितु तिवारी (२३) या जखमी आहेत.

ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून अजूनही काही रहिवाशी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे

मुंबई महानगरपालिकेकडून दरड कोसळणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सातत्याने घरे खाली करण्याचे आवाहन केले जाते.

मात्र नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, अशा दुर्घटनांमध्ये रहिवाशांना हकनाक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन मुंबच्यामहापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंबूर व विक्रोळीतील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

या दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. याशिवाय दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या रहिवाशांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अतीव दुःखदायक आहे. शोकाकुल कुटुंबांचे मी सांत्वन करतो. तसेच मदत व पुनर्वसन कार्य सफल होण्याची प्रार्थना करतो.
रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

हेही वाचलं का ?

Back to top button