राज्यपालांची कतार वाणिज्यदूतांनी घेतली भेट, ‘फिफा फुटबॉल वर्ल्डकप’साठी दिले निमंत्रण | पुढारी

राज्यपालांची कतार वाणिज्यदूतांनी घेतली भेट, 'फिफा फुटबॉल वर्ल्डकप'साठी दिले निमंत्रण

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कतारचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज (दि. २२) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविण्यास कतार सिद्ध झाला आहे. यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वर्ल्ड कप पाहण्यासाठी कतारला यावे असे निमंत्रण अहमद साद अल-सुलैती यांनी त्यांना दिले. भारतीय लोक कतारच्या विविध क्षेत्रांत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी राज्यपालांना यावेळी सांगितले.

कतारने दोहा येथे भारतीय दूतावासाला तसेच भारतीय राजदूतांच्या निवासस्थानासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करून भारताने देखील कतारच्या वाणिज्य दूतावासासाठी मुंबई येथे जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती अल सुलैती यांनी राज्यपालांकडे केली.

कोरोना संसर्गाच्या काळात कतारने भारताला वैद्यकीय द्रवीभूत ऑक्सिजन निःशुल्क उपलब्ध करून अनेक लोकांना जीवदान दिल्याबद्दल राज्यपालांनी वाणिज्यदुतांचे आभार व्यक्त केले.  कतारने भारतात विविध क्षेत्रांत गुंतवणूक करावी व भारताच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. मुंबईत पाहिजे असलेल्या जमिनी संदर्भात दुतावासाने प्रस्ताव दिल्यास आपण त्याचा पाठपुरावा करू, असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button