टीईटी परीक्षा घोटाळा : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे अटकेत | पुढारी

टीईटी परीक्षा घोटाळा : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे अटकेत

मुंबई, पुढारी ऑनलाईन : टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. (टीईटी परीक्षा घोटाळा) गेल्या महिन्यात प्रदीर्घ काळानंतर घेतलेल्या टीईटी परीक्षेत घोळ झाल्याने अनेक परीक्षार्थींचा जीव टांगणीला लागला आहे. पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून परीक्षा घेणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक केली होती.

या परीक्षेनंतर म्हाडाच परीक्षा घेणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते. म्हाडाच्या परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचाही समावेश होता.

टीईटी परीक्षा घोटाळा : देशमुखच्या घरात ओळखपत्रे आणि हॉल तिकीट 

पोलिसांनी प्रीतिश देशमुखच्या घराची झाडाझडती घेतली असता टीईटीची ओळखपत्रे आणि हॉल तिकिटे सापडली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय होता. त्यादृष्टीने सायबर पोलिसांनी तपास केला. यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतर सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर खळबळ उडाली असून तपासाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पहावे लागेल. प्रदीर्घ काळानंतर टीईटी परीक्षा झाल्याने अनेक परीक्षार्थींचे डोळे निकालाकडे लागले होते. मात्र, परीक्षा परिषदेच्या आयुक्तालाच अटक केल्याने निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

म्हाडाची परीक्षा घेण्यासाठी नेमलेली कंत्राटदार कंपनीच पेपरफुटीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती म्हाडा आणि ‘एमपीएससी’ची तांत्रिक समितीला मिळताच आठ दिवसांपूर्वी म्हाडा पुणे मंडळाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुख याला भेटण्यासाठी दलाल येणार असल्याची माहिती गुप्तहेरांकरवी पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (ता. ११) रात्री दहा वाजता विश्रांतवाडी येथून प्रीतिश आणि दोन दलालांना अटक केली. रविवारी आणखी दोन दलालांना अटक केली. याप्रकरणी छापे टाकले असता संशयितांच्या घरी टीईटी परीक्षार्थींची ओळखपत्रे आणि हॉल तिकीट मिळाली होती.

हेही वाचा : 

Back to top button