सांगली : ‘अन्न-औषध’च्या कारवाया थंडावल्या! बेकरी, हॉटेल, दुकानदारांकडून नियम धाब्यावर

सांगली : ‘अन्न-औषध’च्या कारवाया थंडावल्या!
सांगली : ‘अन्न-औषध’च्या कारवाया थंडावल्या!
Published on
Updated on

सांगली; शशिकांत शिंदे : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, बेकरी, दुकानदार, खाद्यपदार्थ उत्पादक आणि दूध विक्रेते यांच्याकडून नियम धाब्यावर बसवत मनमानी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका आहे.

शहरासह जिल्ह्यात विविध खाद्यपदार्थ तयार करणारे, दुकाने, हॉटेल यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कोरोना संसर्गाच्या काळापासून लोक खाद्यपदार्थ, आरोग्य याबाबतीत खूपच दक्ष झाले आहेत. आजारी पडू नये यासाठी ताजे व चांगले पदार्थ खाण्यावर लोकांचा भर आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सप्टेंबरपासूनच तपासणीची मोहीम सुरू केली होती. खाद्यपदार्थ उत्पादक कारखाने, तेल निर्मिती कारखाने, हॉटेल, बेकरी यांच्यावर धाडी टाकण्याची मोहीम उघडण्यात आली होती. त्यामध्ये अनेकांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी काही जणांकडे जप्त नमुन्यांमध्ये भेसळ दिसून आल्याने त्यांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.

मात्र दसरा, दिवाळी संपल्यानंतर या विभागामार्फत फारशी कारवाई झालेली दिसून येत नाही. कोणत्याही प्रकारची तपासणीच नसल्याने बेकरी, हॉटेल, दुकानचालक, विविध खाद्यपदार्थ उत्पादकही बिनधास्त झाले आहेत. अनेक बेकरींमध्ये विक्री होत असलेल्या उत्पादनांवर उत्पादन, एक्स्पायरीची तारीख दिसून येत नाही. त्यांना विचारले तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. हॉटेल, बेकरीत अनेक कर्मचारी
मास्कचाही वापर करीत नाहीत. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणीत आणि कारवाईत सातत्य ठेवावे, अशी लोकांची अपेक्षा आहे.

गुटखा, मावा यांची खुलेआम विक्री, तस्करी

लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी सरकारने राज्यात गुटखा, मावा यावर बंदी घातली आहे. मात्र त्यांची खुलेआम विक्री आणि तस्करी होत आहे. पानपट्टीत गुटखा, मावा मिळतो आहे. काही ठिकाणी माव्यात वापरण्यात येणारे पाणी गांजामिश्रित असते. कर्नाटक सीमा भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा जिल्ह्यात येतो. या सर्वाकडे अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्याबाबतही कारवाई फारशी झालेली दिसून येत नाही.

हॉटेलमधील पाणी पिण्यासाठी धोकादायक

अनेक हॉटेलमध्ये बोअरचे पाणी वापरले जाते. काही ठिकाणी ते पिण्यासाठीसुद्धा देण्यात येते. काही ग्राहक हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी विकत घेतात. मात्र, काही ग्राहक हॉटेलमधीलच पाणी पितात. हे क्षारयुक्त पाणी आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्याकडे सुद्धा अन्न-औषध प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष आहे. यातून नागरिकांना विविध आजार होण्याची शक्यता आहे.

कारवाई केली नाही तर आंदोलन : जितेंद्र शहा

याबाबत शिवसेनेचे जितेंद्र शहा म्हणाले, महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात खाद्यतेल, आकर्षक मिठाई, खवा, फराळाचे पदार्थ यामध्ये भेसळ दिसून येत आहे. भेसळीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. भेसळीचे अन्नपदार्थ खाल्ल्याने नागरिकांना अनेक आजार होत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणे चुकीचे आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागाने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news