Landslide Anuskura Ghat : अणुस्कूरा घाटात दरड कोसळली, चार तासानंतर वाहतूक पूर्ववत | पुढारी

Landslide Anuskura Ghat : अणुस्कूरा घाटात दरड कोसळली, चार तासानंतर वाहतूक पूर्ववत

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजापूर ,कोल्हापूर जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात मंगळवारी आज (दि.१४) सकाळी आठ वाजता मोठ्याप्रमाणावर दरड कोसळून संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. दरम्यान ,सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटवली. चार तासानंतर दरड हटवून घाटातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली. (landslide Anuskura Ghat)

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील आंबा घाटांसह कोल्हापूरला जोडणाऱ्या अन्य घाटातील वाहतूक बंद झाली होती. केवळ अणुस्कुरा घाट मार्गेच वाहतुक सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी घाटात दरड कोसळून मोठमोठ्या दगडांसह भला मोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर येवून पडला. यामुळे घाटमार्गे असलेली वाहतूक बंद पडली होती.

Landslide Anuskura Ghat : सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क

 घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूरचे उपअभियंता एस. एस. दुधाडे, शाखा अभियंता स्वप्निल बावधनकर आणि त्या विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. राजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन परबकर व त्यांचे सहकारी देखील घाटात दाखल झाले.

संबंधित विभागाच्यावतीने जेसीबीने दरड हटविण्याचे काम सुरु झाले. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोसळलेली दरड हटविण्‍यात यश आले.  घाटमार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.

वाहतूक सुरळीत

जुलै महिन्यात झालेल्या तुफान पावसाने आंबा घाटाला फटका बसला होता. तेव्हापासून आंबा घाटमार्गे अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. ती अणुस्कुरा मार्गे वळविण्यात आली आहे.सध्या एसटीचा संप असल्याने रत्नागिरी, लांजा देवरुख येथील एसटी बस सेवा बंद आहे. परंतू मालवाहतुकीसह व विविध प्रकारची वाहतुक अणुस्कूरा मार्गे सुरु असते. दरम्यान घाटात दरड कोसळल्याने चार तास सर्व वाहतूक बंद होती. दरड हटविताच वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचलं का? 

Back to top button