पोर्ले तर्फे ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : या दिनकर चौगुलेला काय वेड लागलंय का? स्मशानभूमीत जेवण आणि सॅलड पार्टी ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया पोर्ले तर्फे ठाणे तील ग्रामस्थांतून व्यक्त झाली. निमित्त होतं शनि अमावस्येदिवशी स्मशानभूमीत होणार्या भुताच्या भेटीचं.
माणूस जिवंतपणी स्मशानभूमीत फक्त अंत्ययात्रेतून जातो किंवा रक्षाविसर्जनासाठी. त्यावेळी माणसांच्या मनात असते केवळ दु:ख आणि भीती. हीच अनामिक म्हणजेच भुताची भीती दूर करण्यासाठी पोर्ले तर्फे ठाणे येथील सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी शनि अमावस्येला चक्क स्मशानभूमीतच रात्री सॅलड पार्टी ठेवली अन् सारा गाव अचंबित झाला. शनिवारी (दि.4) शनि अमावस्येदिवशी रात्री ग्रामपंचायत चौकातून पारंपरिक लेझीम-हलगीच्या गजरात मिरवणूक काढून पोर्ले तर्फ ठाणे येथील स्मशानभूमीत रात्री सॅलड पार्टी करण्यात आली. यावेळी जीवरक्षक दिनकर कांबळे यांचा सरपंच सौ. गीता चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिनकर कांबळे म्हणाले, ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात. तसेच माणसाने 'भीती' हा शब्द मनातून काढून टाकला पाहिजे. स्वत:वर विश्वास असेल तर कसलीही भीती राहणार नाही.
युवराज कांबळे, अनिल पुणवतकर यांची भाषणे झाली. स्मशानभूमीतील सॅलड पार्टीला सरपंच सौ. गीता चौगुले, उपसरपंच जीवन खवरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संभाजी जमदाडे, युवराज कांबळे, रोहिणी चौगुले यांच्यासह मठ तालीम मंडळाचे लेझीम पथक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश ठाणेकर यांनी केले.