पुण्यात ओमायक्रॉनची एंट्री! पिंपरीत ६, तर पुण्यात आढळला १ रुग्ण  | पुढारी

पुण्यात ओमायक्रॉनची एंट्री! पिंपरीत ६, तर पुण्यात आढळला १ रुग्ण 

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कल्याण, डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता पुण्यातही ओमायक्रॉचे ७ रुग्ण (पुण्यात ओमायक्रॉनची एंट्री) आढळून आले आहेत. यापैकी पुणे शहरात १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. त्या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे संपर्कातील आहेत.

पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे. पिंपरीमधील सहाही रुग्ण एकाच कुटूंबातील आहे. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून ४४ वर्षीय महिला तिच्या भावाला पिंपरी चिंचवडला भेटण्यासाठी आली होती. तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ यासह त्याच्या दोन्ही मुली, असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४  नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.

या तिघींच्या 13 निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे.

पुणे शहरातील ओमायक्रॉन (पुण्यात ओमायक्रॉनची एंट्री) बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर 2021 या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळला. त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचलं का?

Back to top button