राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार बेरोजगारांना रोजगार : नवाब मलिक | पुढारी

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार बेरोजगारांना रोजगार : नवाब मलिक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये 26 हजार 093 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला. अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

(Jobs in Maharashtra) महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. (Jobs in Maharashtra ) अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2020 मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरअखेर 1 लाख 73 हजार 974 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मंत्री नवाब म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात.

त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 92 हजार 350 इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मुंबईत नोव्हेंबरमध्ये 9 हजार 018 बेरोजगारांना रोजगार

मंत्री मलिक म्हणाले की, नोव्हेंबर 2021 मध्ये विभागाकडे 46 हजार 283 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 12 हजार 577, नाशिक विभागात 5 हजार 003, पुणे विभागात सर्वाधिक 18 हजार 097, औरंगाबाद विभागात 5 हजार 811, अमरावती विभागात 1 हजार 686 तर नागपूर विभागात 3 हजार 109 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

नोव्हेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 26 हजार 093 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात 9 हजार 018, नाशिक विभागात 2 हजार 089, पुणे विभागात सर्वाधिक 12 हजार 592, औरंगाबाद विभागात 1 हजार 770, अमरावती विभागात 226 तर नागपूर विभागात 398 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button