IND vs SA : द. आफ्रिका दौऱ्यारून BCCI ची मोठी घोषणा! - पुढारी

IND vs SA : द. आफ्रिका दौऱ्यारून BCCI ची मोठी घोषणा!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने वेळापत्रकाप्रमाणे खेळवले जाणार आहेत. पण ४ टी-२० सामन्यांची मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. आज बीसीआयच्या (BCCI) बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र, बैठकीत टी-२० मालिकेतील सामन्यांच्या नव्या तारखांवर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सूत्रांक़डून समजत आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे, भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फक्त कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे आणि टी-20 मालिका खेळली जाणार नाही. बीसीसीआयच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, भारतीय संघ तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. ते म्हणाले, बीसीसीआयने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला कळवले आहे की भारतीय संघ तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. उर्वरित चार टी-२० सामने नंतर खेळवले जातील.’

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने होणार…

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने होणार आहे. यापूर्वी हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता पण आता बॉक्सिंग डे कसोटीने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना प्रकारामुळे (ओमायक्रॉन) हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून तोपर्यंत परिस्थितीचा आढावा घेता येईल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने तयार केलेला बायो-बबल खेळाडूंसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल याची बीसीसीआयला पूर्ण खात्री आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार आढळला आहे जो अत्यंत धोकादायक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा दौरा होऊ शकत नाही, अशी अटकळ संघाच्या दौऱ्याबाबत वर्तवली जात होती. मात्र, आता बीसीसीआयने या दौऱ्याला मान्यता दिली आहे. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. गेल्या वेळी त्याला कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण यावेळी विजय मिळवण्यात यश येईल अशी शक्यता माजी क्रिकेटपटूंनी वर्तवली आहे.

Back to top button