गुलाम नबी आझाद काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी; नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत | पुढारी

गुलाम नबी आझाद काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी; नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन

काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणारे गुलाम नबी आझाद आता काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ज्याप्रकारे नवा पक्ष स्थापन केला, त्यापद्धतीने नवा पक्ष स्थापन करण्याच्यात तयारी असल्याचे समजते.
गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे जम्मू आणि काश्मिरमधील ज्येष्ठ नेते असून अनेक वर्षे त्यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. मात्र, काँग्रेसने त्यांना मुदत संपल्यानंतर पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी नाराज G 23 गटात सहभागी होत काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले होते.

आझाद हे जनाधार गमावलेले नेते आहेत असा काँग्रेसमधील एका गटाचा दावा आहे तर पूँछ येथे एका जनसभेला संबोधित करताना २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष बहुमताकडे जाणार नाही, असे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे सूतोवाच केले. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून त्यामुळे जनाधार गमावल्याच्या दाव्याला हा छेद आहे असे मानले जात आहे. आझाद लवकरच पक्ष सोडणार असून नवा पक्ष स्थापन करतील असे काँग्रेसमधील काही नेते सांगत आहेत.

आझाद जम्मू काश्मिरचा दौरा करत असून त्यांच्या सभांना होणारी गर्दी काँग्रेसची डोकेदुखी वाढवत आहे. आझाद याचे अलिकडच्या काळात भाजपशी सख्य वाढले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात होते, मात्र कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणे ते नवा पक्ष स्थापन करून भाजपशी आघाडी करतील असे कयास बांधले जात आहेत. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा, विधानसभा निवडणुका, अनुच्छेद ३७० आदी विषयांबाबत ते सभांमधून ते बोलत आहेत. अन्य पक्षांतील अनेक नेते आझाद यांच्याशी संपर्कात असून, ते लवकरच आझाद यांच्यामागे जातील असे बोलले जात आहे.

आझाद यांच्या २० निकटवर्तीयांचे राजीनामे

आझाद हे काँग्रेसमध्ये साइडलाइन झाल्यानंतर २० निकटवर्तीयांनी राजीनाने देत काँग्रेसला रामराम केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते रविंदर शर्मा म्हणाले, संपूर्ण काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा सन्मान करतो. मात्र, पक्षाच्या शिस्तीचे पालन करायला हवे. आझाद यांचे निकटवर्तीय ज्या पद्धतीची विधाने करत आहेत, त्यावरून पक्ष शिस्तीचे ते उल्लंघन करताना दिसत आहेत.’

हेही वाचा : 

Back to top button