‘सुनील तटकरे यांना पदे घरात हवी, त्यांनी जमिनी हडपल्या’ ! शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप | पुढारी

‘सुनील तटकरे यांना पदे घरात हवी, त्यांनी जमिनी हडपल्या’ ! शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप

चिपळूण, पुढारी ऑनलाईन

सुनील तटकरे यांना सगळी पदे आपल्या घरात ठेवून दुसऱ्याच्या राजकीय जीवनाची माती करायची असते, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. तसेच तटकरे यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी लाटल्याचा आरोपही त्यांनी केला.

जाधव म्हणाले, ‘कुणबी समाजाला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व द्या, असे मी म्हणालो तर सुनील तटकरे यांना इतक्या मिरच्या का झोंबल्या? राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेऊन नेहमी कुटुंबातच राजकारण करायचे, सगळी पदे घरात ठेवायची, असे त्यांचे धोरण आहे. त्यांनी बोगस कंपन्या काढून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमीन हडपल्या. ही त्यांची नितीमत्ता आहे. त्यांना उपकारांची जाण नाही. त्यामुळे त्यांना मी मार्गदर्शन करूच शकत नाही. अंगावर आलात तर भास्कर जाधव शांत बसणार नाही, असेही जाधव म्हणाले.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची जागा कुणबी समाजाला द्यावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी खेड तालुक्यातील पंधरागाव आंबडस येथे शिवसेना मेळाव्यात केली होती. त्यांच्या या मागणीवर खासदार सुनील तटकरे यांनी ‘जाधव यांनी कुणबी समाजाचा अपमान केला आहे. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना अशी राजकीय वारी करणाऱ्या आमदार जाधवांचे आपण मार्गदर्शन घेऊ, असे उपरोधिक टोले लगावले होते. त्यामुळे तटकरे यांच्यावर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत हल्ला केला.

कोकणात धुमशान

कोकणातील भास्कर जाधव आणि सुनील तटकरे हे कधी काळी राष्ट्रवादीतील सहकारी होते. मात्र, स्थानिक राजकारणात या दोघांत विस्तव जात नाही. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीही भास्कर जाधव आणि सुनील तटकरे असा सामना रंगला होता. मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला होता. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर संधी देऊ असे आश्वासनही त्यावेळी दिले होते. त्यावरून आता भास्कर जाधव यांनी तटकरे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button