पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे.
मंगळवारी रात्री प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक्स पोस्टवरून नाना पटोले यांच्या घातपाताचा डाव होता, असा आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला. त्यांचा घातपात करण्याचा डाव होता. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने त्यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा :